दूध आंदोलन पेटले : स्वाभिमानीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:58 PM2018-07-16T13:58:16+5:302018-07-16T13:58:38+5:30
दुध संघांनी दूध संकलन बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान स्वाभिामनीचे उत्तर जिल्हाध्यक्ष रविंद मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांना शिर्डी पोलिसांनी पहाटेच ताब्यात घेतले आहे.
अहमदनगर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या दूध बंद आंदोलनाला नगर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील प्रमुख दुध संघांनी दूध संकलन बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान स्वाभिामनीचे उत्तर जिल्हाध्यक्ष रविंद मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांना शिर्डी पोलिसांनी पहाटेच ताब्यात घेतले आहे.
दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी दूध बंद आंदोलनाची हाक देण्यात आली. रविवारी मध्यरात्रीपासूनच कार्यकर्त्यांनी बड्या शहरांकडे जाणारे दुधाचे टँकर रोखण्याची तयारी केली होती. पोलिसांनी माहामार्गांवर ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उत्तर नगर जिल्ह्यातील दूध आंदोलनाचे नेतृत्व राहुरी येथील रविंद्र मोरे करत आहेत. दक्षिण नगर जिल्ह्याची जबाबदारी बाळासाहेब लोंढे यांच्याकडे आहे. उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रविवारी मध्यरात्री शिर्डी येथे जावून साईबांबांना दुधाचा अभिषेक घालत आंदोलनाला प्रारंभ केला. मात्र मोरे यांच्यासह दिनेश वराळे, अरुण डौले, किशोर वराळे, अजिनाथ वरघुडे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबध्द केले. पाथर्डी तालुक्याचे अध्यक्ष शरद मरकड यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दूध आंदोलनाला संकलन बंद ठेवून दूध संघांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण दूध संकलन बंद आहे़ दूधाचा एकही टँकर रस्त्यावर दिसत नसल्याचे प्रकर्षाने जाणवले.