कोरोनामुळे दूध उत्पादक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:19 AM2021-05-10T04:19:49+5:302021-05-10T04:19:49+5:30
कोरोना संकटामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारी थैमान घातल असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला ...
कोरोना संकटामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत.
गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारी थैमान घातल असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. वर्षभरापासून शेतमालाला पाहिजे तितका दर मिळत नाही. त्यात दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची 'दुष्काळात तेरावा महिना' म्हणावे अशी परिस्थिती झाली आहे.
गतवर्षी कोरोना टाळेबंदीच्या काळात घसरलेल्या दुधाच्या दरात मध्यंतरी वाढ झाली होती; परंतु सध्या कोरोनाच्या निर्बंधामुळे प्रतिलिटर ५ ते१० रुपयांनी दर घसरले आहेत. दूध दरात झालेल्या घसरणीमुळे पशुपालकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
ग्रामीण भागात शेतीसाठी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यासाठी जनावरांना हिरवा चारा, वैरण व खुराकाची आवश्यकता असते. भुसा व पेंडीचे दर गगनाला भिडले आहेत व दुधाचे दर मात्र कमी झाले आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. दोन महिन्यांपूर्वी गाईच्या दुधाला ३० ते ३३ रुपये दर दिला जात होता. कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली अन् शासनाने कडक निर्बंध लागू केले. त्यामुळे मुंबई, नाशिक पुणेसारख्या महानगरातील दुधाची मागणी घटली. तसेच ग्रामीण भागात असलेल्या लहान-मोठे हॉटेल व्यवसाय बंद असल्याने, याचा परिणाम म्हणून आज रोजी गाईचे दूध २० ते २५ रुपये, तर म्हशीचे दूध ३० ते ३५ रुपये लिटरने खरेदी केले जात आहे.
सध्या राज्यात केलेल्या संचारबंदीमुळे पशुखाद्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. तर दूध दरात मात्र मोठी उतराई झाली आहे. गाईच्या दुधास प्रतिलिटर ३० ते३५ रुपये असलेला भाव संचारबंदीमुळे २० ते २५ रुपये इतका झाला आहे. नाइलाजास्तव शेतकऱ्यांना दुधाची विक्री प्रतिलिटर पाण्याच्या बाटलीच्या किमतीत करावी लागत आहे.
...............
खुराकाच्या किमती वाढल्या
जनावरांना लागणाऱ्या खुराकाच्या (खाद्य) वाढलेल्या किमती व चाऱ्याचा विचार केला तर शेतकऱ्यांना एक लिटर दूध उत्पादनासाठी तब्बल २५ रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र हेच दूध सध्या २० ते २५ रुपये लिटरने विकले जात असल्याने, शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
.............
उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून, जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा दूध उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील पाच-सहा महिन्यांपासून ऊसतोडणी सुरू होती. मात्र साखर कारखाने बंद झाल्याने जनावरांना हिरवा चारा म्हणून उपलब्ध होत असलेले उसाचे वाढे मिळत नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी वर्गापुढे हिरव्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.