लाखोंचे मोर्चे दिसले, आता निर्मनुष्य रस्ते हवेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:00 PM2020-03-21T23:00:55+5:302020-03-21T23:02:07+5:30
सुधीर लंके/अहमदनगर : कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी नगर जिल्ह्याचे प्रशासन जे परिश्रम घेत आहे त्याबद्दल त्यांना शाबासकी दिली पाहिजे. नगर जिल्ह्याने लाखोंचे मोर्चे काढण्याचे उदाहरण राज्याला दाखवून दिले. हे मोर्चे शिस्तबद्ध होते. आता कोरोनाला रोखण्यासाठी रस्ते, सार्वजनिक ठिकाणे निर्मनुष्य करुन तशीच शिस्त दाखविण्याची आवश्यकता आहे. गर्दीचा उच्चांक केला, तसा काही दिवस माणसांनी माणसांपासून अलग राहण्याचा म्हणजेच संचारबंदीचा उच्चांक घडवायचा आहे. संयम दाखवायचा आहे.
सुधीर लंके
अहमदनगर : कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी नगर जिल्ह्याचे प्रशासन जे परिश्रम घेत आहे त्याबद्दल त्यांना शाबासकी दिली पाहिजे. नगर जिल्ह्याने लाखोंचे मोर्चे काढण्याचे उदाहरण राज्याला दाखवून दिले. हे मोर्चे शिस्तबद्ध होते. आता कोरोनाला रोखण्यासाठी रस्ते, सार्वजनिक ठिकाणे निर्मनुष्य करुन तशीच शिस्त दाखविण्याची आवश्यकता आहे. गर्दीचा उच्चांक केला, तसा काही दिवस माणसांनी माणसांपासून अलग राहण्याचा म्हणजेच संचारबंदीचा उच्चांक घडवायचा आहे. संयम दाखवायचा आहे.
नगर जिल्ह्यात आत्तापर्यंत १९४ जणांचे नमुने प्रशासनाने घेतले. त्यापैकी केवळ दोनजण कोरोनाबाधित आहेत. ते विदेशात गेले होते म्हणून बाधित झाले. त्यांची प्रकृतीही उत्तम आहे. त्यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही. तपासणी झालेल्या १९४ पैकी १७२ जण हे विदेशवारी करुन आलेले आहेत. खबरदारी म्हणून प्रशासनाने त्यांचे विलगीकरण केले आहे. विदेशात गेलेल्या नागरिकांच्या संपर्कात आले म्हणून स्थानिक २२ नागरिकांचेही घशातील श्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले. स्थानिकांपैकी कोणालाही
अद्याप या विषाणूची बाधा झालेली नाही. कोरोनाची बाधा झाली म्हणजे मृत्यूच होतो असे अजिबात नाही. मात्र, या विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून तो उखडून फेकणे आवश्यक आहे. जगावर त्याचे संकट आहेच. दुर्लक्षून चालणार नाही.
यासाठी काही दिवस खबरदारी हवी. विदेशातून आलेल्या नागरिकांनी स्वत:हून प्रशासनाला कल्पना द्यावला हवी. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी एकमेकांशी संपर्क टाळणे हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व व्यवहार व व्यापारी आस्थापना बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. इतर जिल्ह्यांच्या अगोदर नगरने ही उपाययोजना सुरु केली. त्यास जनतेतूनही चांगला प्रतिसाद आहे. शिर्डी, शिंगणापूर, सिद्धटेक, मोहटादेवी, देवगड ही जिल्ह्यातील मोठी देवस्थाने बंद आहेत. अनेक गावांनी आपल्या यात्रा बंद केल्या. तमाशे बंद झाले. बाजार भरविणेही थांबविण्यात आले. राजकीय कार्यक्रम बंद आहेत. शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, उद्याने, खेळाची मैदाने, व्यायामशाळा, व्यापारी दुकानेही बंद आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. उत्स्फूर्तपणे हा बंद पाळल्याबद्दल जनताही अभिनंदनाला पात्र आहे. आमदार, खासदार यांनी सार्वजनिक कार्यक्रम जवळपास बंद केले आहेत. लग्न, दहावे येथील गर्दीही टाळली पाहिजे. राहिबाई पोपेरे, पोपटराव पवार हे समाजकार्यकर्तेही लोकांनी संपर्क टाळावा असे आवाहन करत आहेत. राहिबार्इंनी सर्व कार्यक्रम नाकारले. आपली बियाणे बँक बघायला येऊ नका असे लोकांना सांगितले. हिवरेबाजारने पर्यटकांना काही दिवसांसाठी बंदी केली. लोकांच्या हितासाठी हे करावेच लागेल.
गावाची चावडी, गल्ली, अपार्टमेंट येथे देखील लोकांनी एकत्र जमायला नको. घरात बसून कुटुंबात रमणे हा सोपा मार्ग आहे. जिल्हा प्रशासनासह, महापालिका, जिल्हा
रुग्णालय, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांचे कर्मचारी दिवसरात्र एक करुन जनतेसाठी झगडत आहेत. ‘आम्ही कर्तव्यावर आहोत, तुम्ही आमच्यासाठी घरी थांबा’ असे आवाहन आरोग्य पथकांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून
केले आहे. प्रशासनाने जे आवाहन केले त्यास जनतेतूनही चांगला प्रतिसाद आहे. आर्थिक झळ सोसून लोक बंद पाळत आहेत. नगर जिल्ह्यात सहकारी संस्था, पतसंस्था, सहकारी बँका मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांनीही कमीत कमी मनुष्यबळात कार्यालये कशी चालविता येतील यावर विचार करायला हवा.
--------------
साईबाबांनी केले होते गरिबांना मदत करण्याचे आवाहन
शिर्डीत १९११ साली प्लेगची साथ आली होती. त्यावेळी साईबाबांनी शिर्डीत स्वच्छता मोहीम राबवली. रस्ते साफ करा, स्मशाने-थडगी साफ करा असे आवाहन त्यांनी ही साथ घालविण्यासाठी केले होते. त्यावेळी गरिबांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांना अन्नदान करा असेही आवाहन साईबाबांनी केले होते. कोरोनाशी लढा देतानाही अनेक गरिबांचा रोजगार बुडणार आहे. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी अशा कुटुंबांना मदत करण्याचे धोरणही घेतले पाहिजे. शिर्डीत १९४१ साली कॉलराची साथ आली होती. त्यावेळी शिर्डी बंद करण्यात आली होती. नगर जिल्ह्यात १९१८ साली मानमोडीचीही साथ आली होती. त्यात ताप मेंदूत जाऊन माणसांचा मृत्यू होत होता. अकोले तालुक्यातील एकट्या वाशेरे गावात जुलै २०१८ मध्ये त्या साथीने ९१ व्यक्तींचा मृत्यू झाला होता, असा संदर्भ स्थानिक अभ्यासक शांताराम गजे यांनी दिला.
--------------
श्रीरामपूरच्या आमदारांचा आदर्श
श्रीरामपुरचे आमदार लहू कानडे यांनी आमदार निधीतून गरीब कुटुंबांना हात धुण्यासाठी साबन, हॅण्ड वॉश हे साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने हात स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. पण यासाठीची साधने गरिबांकडे असतातच असे नव्हे. त्यामुळे कानडे यांनी हा निर्णय घेतला. असे साहित्य खरेदी करण्यासाठी नियमांची अडचण होती. त्यामुळे कानडे यांनी प्रधान सचिवांकडे पाठपुरावा करुन परवानगी मिळवली. स्थानिक गरज पाहून आमदार निधी खर्च करण्याचा चांगला पायंडा यातून पडू पाहत आहे.