नगरमध्ये लाखो मूर्तीच्या विक्रीत कोट्यवधींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 04:58 PM2019-09-04T16:58:49+5:302019-09-04T17:05:25+5:30
वाढती महागाई, दुष्काळाचे सावट आणि आर्थिक मंदीची झळ असतानाही गणेश मूर्तीच्या विक्रीने ‘कोटी’ची उड्डाणे घेतली आहेत.
सुदाम देशमुख
अहमदनगर : मनोकामनांची पूर्ती करणाºया मंगलमूर्ती गणपती बाप्पांचे सोमवारी घरोघरी आगमन झाले. पूर्वा नक्षत्राच्या रिमझिम पावसाने चिंब झालेल्या महाराष्ट्रात बाप्पांच्या आगमनामुळे नवचैतन्य संचारले आहे. वाढती महागाई, दुष्काळाचे सावट आणि आर्थिक मंदीची झळ असतानाही गणेश मूर्तीच्या विक्रीने ‘कोटी’ची उड्डाणे घेतली आहेत.
अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाला सोमवारी (दि. २) राज्यभरात प्रारंभ झाला. गणेश मूर्तीसह सजावटीच्या साहित्यांनी राज्यभरातील बाजारात उत्साह होता. वर्षभरापासून मूर्ती तयार करण्याचे काम अनेक शहरांमध्ये सुरू होते. कारखानदारांनी विविध रुपातील आणि आकारातील मूर्ती विक्रीसाठी आणल्या होत्या. अहमदनगर, नाशिक, मुंबई, सोलापूर आदी ठिकाणी तयार झालेल्या मूर्तीना महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यातून मागणी होती. मुंबईमध्ये तयार झालेल्या मूर्तीना पूंज, नेपाळ, राजस्थान, गुजरातसह अमेरिका, लंडन येथूनही मागणी होती. यंदा काही कारखानदारांनी प्लास्टर आॅफ पॅरिसऐवजी शाडू मातीच्या मूर्ती तयार केल्या होत्या. त्याला गणेश भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ५० ते १०० रुपयांपासून ते १५ ते ३० हजार रुपये किमती असलेल्या मूर्ती बाजारात होत्या. ‘हिरेजडीत मुकुट शोभतो बरा’ अशा आकर्षक रंग, डायमंड, दागिन्यांची कलाकुसर केलेल्या मूर्तीला अधिक पसंती दिली गेली. अशा मूर्तिंची किंमत इतर मूर्तीपेक्षा १० ते १५ टक्के जास्त होती.
मूर्ती तयार करण्यासाठी लागणाºया वेगवेगळ््या कच्च्या मालावर जीएसटी द्यावी लागते. रंग आणि मजुरीचे दर वाढल्याने यंदा मागील वर्षीच्या तुलनेत २५ ते ३० टक्क्यांनी गणपती मूर्तीचे दर वाढले होते. या दरवाढीचा मूर्ती खरेदी-विक्रीवर विशेष परिणाम नव्हता. कोल्हापूर, सांगली येथील पूर परिस्थितीमुळे मात्र तेथून होणारी मूर्तीची मागणी घटली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़
सव्वाशे कोटींची उलाढाल
‘लोकमत’ने राज्यातील १२ शहरांमधील गणेश मूर्तीच्या विक्रीचा आढावा घेतला असता या शहरांमध्ये २२ लाखांपेक्षा अधिक मूर्ती विक्रीला आल्या होत्या. या विक्रीतून १२७ कोटी रुपयांची उलाढाल झाली असून तब्बल ३५ हजारांपेक्षा जास्त जणांना रोजगार मिळाला आहे. पुरुष-महिलांसह हंगामी रोजगाराची संधी म्हणून मूर्ती विक्रीच्या या उद्योगात तरुणही होते. दुष्काळ, महागाई, मंदीचा फटका यामुळे राज्यात सरासरी विक्रीत १० टक्के घट झाल्याचे विक्रेते सांगत आहेत.
‘पेण’च्या कारखानदारांचे धोरण
नगरचे ५० टक्के कारखानदार पेण (जि. रायगड) येथून कच्चा माल आणायचे. तेथून आणलेल्या साच्यातील मूर्तींना नगरमध्ये आणून रंग द्यायचे. यंदा मात्र पेण येथील कारखानदारांनी त्यांचे धोरण बदलले आहे. नगरसह राज्यातील रंग देणाºया कारागिरांनाच त्यांनी पेणमध्ये बोलावून तयार मूर्तींची थेट विक्री केली. त्यामुळे यंदा नगरमध्ये तयार होणाºया मूर्तीमध्ये १० टक्के घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
गणेशोत्सव हा एका धर्मापुरता मर्यादित न राहता आता सर्वधर्मीयांचा झाला आहे. यामध्ये सर्वधर्मीयांचा सहभाग असतो. मंडप बांधण्यापासून मूर्ती घडवणे, मूर्ती ला आकार देणे अशा विविध कामांमध्ये सर्वधर्मीय जातपात, पंथ, धर्माचा भेदभाव न करता सहभागी होतात. यामध्ये जरी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी तीन महिने तरी बेरोजगारांना रोजगार मिळतो. यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शासनाने या कोट्यवधींचा व्यवहार असलेल्या या मूर्तीकलेच्या बाबतीत लक्ष घातले तर वर्षभर मूर्तिकारांना रोजगार मिळू शकतो. पीओपी ऐवजी शाडूच्या मूर्ती तयार करण्याचा शासनाने गांभीर्याने विचार केला तर राज्यातील लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
- नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती.
....
दुष्काळी स्थिती, तयार झालेल्या मूर्ती ची संख्या जास्त असल्याने किंमतीमध्ये १५ टक्के घट झाली. महापुरामुळे यंदा उत्साह नसल्याने कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात मूर्ती पाठविण्याचे धाडस केले नाही. या सर्वांचा परिणाम म्हणून मूर्ती च्या विक्रीसंख्येत १५ ते २० टक्के घट झाली.
-जयकुमार रोकडे, मूर्तीकार, अहमदनगर.