लाखो लिटर पाणी गटारात; प्राधिकरणाची डोळेझाक
By Admin | Published: June 2, 2014 12:16 AM2014-06-02T00:16:42+5:302014-06-02T00:36:09+5:30
अनिल साठे, अहमदनगर दिवसेंदिवस पाण्याचा तुटवडा वाढत्या प्रमाणात जाणवत आहे.
अनिल साठे, अहमदनगर दिवसेंदिवस पाण्याचा तुटवडा वाढत्या प्रमाणात जाणवत आहे. पण, दहा गावाची तहान तृप्त होईल, इतके पाणी मोठ्या प्राणावर गटारात वाहून जात असताना अनेक निवेदने, आंदोलन पत्रव्यवहार करूनही दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी असलेल्या जीवन प्राधिकरणाची निष्क्रियता ठळकपणे समोर येत आहे. राष्ट्रीय संपत्ती असलेले पाणी गटारात वाहून जाताना अधिकारी मात्र हात वर करून डोळे झाकून बसले आहेत. भिंगार शहराला दररोज सरासरी तीन लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. लष्कराकडून दीड लाख ते एक लाख ऐंशी हजार लिटरपर्यंत पाणी पुरवठा होतो आहे. शहरात दोन हजार दोनशे नळजोड आहेत. प्रत्येक नळ जोड धारकांना अर्धा इंची नळीसाठी १५० तर एक इंचीसाठी ३०० रुपये प्रती महा पाणीपट्टी आकारली जाते. तर छावणी परिषद लष्कराकडून २५ रुपये ९४ पैसे दराने पाणी विकत घेते. ऐन उन्हाळ्यात नागरिक पाणी पाणी करीत असताना मात्र जलवाहिनी गळतीमुळे गेल्या चार वषार्पासून दररोज लाखो लिटर पाणी गटारात वाहून जात आहे. या प्रश्नी विविध पक्ष व संघटनांच्या वतीने अनेकदा जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, प्राधिकरण व छावणी परिषद यांना निवेदन देण्यात आले. दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी असलेल्या जीवन प्राधिकरण यांना पत्र पाठवून तसेच बैठकीत निर्देश दिले असताना देखील कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष काम सुरु केलेले नाही. २३ फेब्रुवारी २००६ पासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शेकडो वेळा पत्रव्यवहार करून जलवाहिनी गळतीची दुरुती करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. सदर जलवाहिनीचा मार्ग बदलावा यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. जलवाहिनी गळतीमुळे राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे. दुरुस्ती करताना केलेल्या खोदाईमुळे झालेली रस्त्यांची वाईट अवस्था झाली आहे. दुरुस्ती दरम्यान खोदाईमुळे झालेले खड्डे बुजवणे व दुरुस्त करणे ही जबाबदारीही जीवन प्राधिकरणाची असताना ही दुर्लक्ष केले जात आहे. (वार्ताहर) जीवन प्राधिकरणने सदर खांब आम्ही आमच्या स्वखर्चाने काढत आहोत, असे सांगत त्यासाठी आम्हाला कोटेशन मागितले होते ते आम्ही त्यांना दिले. १.३ टक्के देखरेखचा चार्ज आम्ही भरण्यास सांगितला होता. वरिष्ठांनी सदर कोटेशन फेटाळून लावले आहे. असे सांगून तो खर्च तुम्ही करावा, असे सांगितले. या प्रश्नाबाबतचे जनहित लक्षात घेऊन आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू. -एन. एम. काकडे, उपअभियंता विद्युत, जीवन प्राधिकरण वाय. सी. सुतार यांच्याशी दीड महिन्यापूर्वी भिंगार प्रतिनिधीने संपर्क साधला होता. त्यावेळी विद्युत महामंडळाकडे उंगलीनिर्देश करीत ते सहकार्य करीत नाही, असा आरोप केला होता. जलवाहिनीला गळती लागलेल्या ठिकाणी काही फुटावर विजेचा खांब आहे, तो त्यांनी काढून घ्यावा. तो खांब हलवण्यासाठी सुमारे ७० हजार खर्च मंडळाने करावा, असी भूमिका सुतार यांनी मांडली होती. अन्य ठिकाणच्या गळती संदर्भात विचारले असता ते काम लगेच उद्या सुरु करू, असे म्हणाले होते. आजतागायत कोणत्याही प्रकारे पाणी गळती थांबविण्यासाठी प्रयत्न झालेला नाही. शुक्रवारी त्यांच्याशी संपर्क साधला असता छावणी परिषदच्या नावाने खडे फोडून हात वर केले आहेत. छावणी परिषदेला जबाबदार धरत आहेत. प्रत्यक्ष जबाबदारी जीवन प्राधिकरणची आहे. जीवन प्राधिकरण यांचे सोबत गेल्या सात ते आठ वर्षापासून चर्चा व पत्रव्यवहार सुरु आहे. वारंवार जलवाहिनी गळती मुळे रस्त्याचे नुकसान होत आहे. जीवन प्राधिकरण शेकडो पत्र पाठवूनही दखल घेत नाही. -आर. आर. राठोड, शाखा अभियंता ( राष्ट्रीय महामार्ग, अहमदनगर) जलवाहिनी गळती संदर्भात संबंधित खात्याला वेळोवेळी कळवले आहे. पत्रव्यवहार केला आहे. दुरुस्ती व देखभाल करण्याची जबाबदारी जीवन प्राधिकरणाची आहे. छावणी परिषद एम एस कडून २५ रुपये ९४ पैसे दराने पाणी विकत घेते. मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही. -शिरकुल, छावणी परिषद कार्यालय, अधीक्षक . अनेक तांत्रिक अडचणी आहेत. छावणी परिषद सहकार्य करीत नाही. जलवाहिनी गळती संदर्भात सीईओ दोन ते तीन वेळा आले होते. अडचणी दूर करून आम्ही लवकर काम सुरु करू. -वाय सी सुतार, जीवन प्राधिकरण.