मैल कामगार संकल्पना बाद झाल्याने महामार्ग दुरुस्तीवर कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 11:52 AM2020-11-04T11:52:06+5:302020-11-04T11:52:59+5:30
अहमदनगर : महामार्गांची नियमित देखभाल व दुरुस्ती होत नाही. हे काम पूर्वी मैल कामगार करीत होते. मात्र, मैल ...
अहमदनगर : महामार्गांची नियमित देखभाल व दुरुस्ती होत नाही. हे काम पूर्वी मैल कामगार करीत होते. मात्र, मैल कामगार ही संकल्पना शासनाच्या उदासीनतेमुळे बाद झाली असून, जिल्ह्यातील साडेसहा हजार किलोमीटरच्या रस्त्यांसाठी अवघे १५ मैल कामगार कार्यरत आहेत.
सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, महापालिकेत मैल कामगार हे पद मंजूर होते. एकट्या सार्वजनक बांधकाम विभागात ३१६ मैल कामगारांची पदे मंजूर आहेत. रस्त्यांवर दररोज फेरटका मारणे, रस्त्यांच्या बाजूला कुणी अतिक्रमण होत असल्यास संबंधित व्यक्तीला समज देणे, खड्डा पडल्यास बाजूला मुरूम काढून तो तत्काळ बुजविणे, रस्त्यांच्या साईड पट्ट्या सुरक्षित ठेवणे, ही कामे मैल कामगार बाराही महिने करीत असत. यामुळे पावसाळ्यापूर्वीची रस्त्यांची दुरुस्ती केली जात होती. मात्र, अलीकडे ही पदे भरली गेली नाहीत. अधिकाऱ्यांना खासगीकरण करण्यात अधिक रस असल्याने मैल कामगारांचे महत्त्व कमी होऊन त्यांची जागा ठेकेदारांनी घेतली. रस्ते नादुरुस्त होईपर्यंत कोणत्याच उपाययोजना करायच्या नाहीत, खड्डे पडल्यानंतरच ते बुजविले जात असल्याने ही कामे वेळवर होताना दिसत नाहीत.
शासनाने मैल कामगारांची रिक्त पदे भरण्याकडे दुलक्ष केले. मैल कामगारांची पदे न भरता खासगीकरणाला प्राधान्य दिले गेल्याने रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात कोरोनाच्या महामारीमुळे रस्त्यांसाठी निधी मिळत नाही. अशा परिस्थितीत कमी खर्चात मैल कामगारांमार्फत रस्ते दुरुस्त करणे शक्य होते; परंतु मैल कामगार नसल्याने नाइलाजाने खड्डे बुजविण्याचे काम ठेकेदारांना देण्यात आले असून, हा खर्च काही कोटींच्या घरात आहे.
महामर्गावरील लाल झेंडा गायब
मैल कामगार लाल झेंडा सायकलला लावत. लाल झेंडा लावलेल्या सायकलवरून ते महमार्गावरून फिरत होते. ते खड्डा पडल्यानंतर लगेच बुजवीत होते; परंतु मैल कामगार आता राहिले नाहीत. त्यामुळे अनेक खड्डे पडल्यानंतर ठेका दिला जातो. मैल कामगारांची जागा ठेकेदारांनी घेतल्याचे चित्र आहे.