ठेकेदाराने खाल्ले लाखोंचे डांबर; नगर जिल्हा परिषदेतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:01 PM2019-10-15T12:01:55+5:302019-10-15T13:04:00+5:30
जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या कामांसाठी एकाच डांबराच्या चलनाचा वापर करुन २७४ मेट्रीक टन डांबराचा घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. ठेकेदाराने ६५ लाखापेक्षा जास्त रुपयांची शासनाची फसवणूक केल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे़.
साहेबराव नरसाळे ।
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या कामांसाठी एकाच डांबराच्या चलनाचा वापर करुन २७४ मेट्रीक टन डांबराचा घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. ठेकेदाराने ६५ लाखापेक्षा जास्त रुपयांची शासनाची फसवणूक केल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे़.
औरंगाबाद येथील अशोक मुंडे यांनी नगर जिल्हा परिषदेचे नोंदणीकृत ठेकेदार जुनेद कलीम शेख यांच्याबाबत तक्रार केली होती़. शेख हे श्रीरामपूर येथील असून, जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाच्या अखत्यारित येणा-या रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांचा ठेका त्यांना देण्यात आला होता़. याबाबत मुंडे यांच्या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेने सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता गावडे यांची चौकशी समिती नेमली होती़. त्यांनी चौकशी केल्यानंतर हा डांबर घोटाळा उघडकीस आला आहे़. या चौकशी अहवालात म्हटले आहे, जुनेद शेख यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत केलेल्या डांबरी रस्त्यांच्या कामासाठी एकूण १७७़३२ मेट्रिक टन डांबर खरेदी केल्याचे दिसून येते़ तर त्यांनी केलेल्या कामांवर २२१़९६ मेट्रिक डांबराचा वापर केल्याचे दिसून येते़ तसेच सार्वजनिक बांधकामच्या संगमनेर विभागाअंतर्गत केलेल्या रस्त्याच्या कामासाठी ठेकेदार शेख यांनी नव्याने डांबर खरेदी केल्याचे दिसत नाही़. परंतु संगमनेरच्या कामांसाठी २२९़६५ मेट्रिक टन डांबर वापरल्याचे कागदोपत्री दिसत आहे़. त्यामुळे संगमनेर येथील कामातील २२९़६५ मेट्रीक टन व जिल्हा परिषदेच्या विविध रस्त्यांच्या कामांसाठी ४४़६४ मेट्रिक टन असे एकूण २७४़२९ मेट्रिक टनाची तफावत दिसून येते़ शेख यांनी विविध कामांमध्ये वारंवार एकाच डांबराच्या चलनाचा वापर करुन ६५ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे शासनाचे नुकसान केले आहे़.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संगमनेर कार्यालयांतर्गत केलेल्या विविध कामांवर वापरलेल्या डांबराची चलने जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीने मागविलेली होती़. हीच चलने जिल्हा परिषदेच्या कामांसाठी जोडण्यात आल्याचे दिसते. संगमनेर कार्यालयाकडे दिलेल्या एकूण ११ चलनांपैकी १० डांबराची चलने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद अशा दोन्ही ठिकाणी वापरल्याचे दिसून येते, असे अहवालात म्हटले आहे़. या चौकशी अहवालावरुन ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन त्यांना काळ्या यादीत टाकावे, असा आदेश जिल्हा
परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी दिला आहे. याबाबत ठेकेदार शेख यांच्याशी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही़.
औरंगाबाद येथील तक्रारदाराच्या तक्रारीवरुन ठेकेदाराची चौकशी लावण्यात आली होती़. या चौकशीचा अहवाल मी पाहिलेला नाही़. पण संबंधित ठेकेदाराकडून खुलासा मागवून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन आंधळे यांनी सांगितले.