...अन् महसूलमंत्री थोरातांनी गाडी थांबवून हटवले स्वत:चेच फलक; कार्यकर्त्यांसह नागरिकही अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 08:08 PM2021-01-01T20:08:36+5:302021-01-01T20:09:54+5:30
अधिकाऱ्यांना फ्लेक्ससाठी नियमावली तयार करण्याच्या सूचना
संगमनेर- महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर दौऱ्यादरम्यान चक्क स्वतःचा फोटो असलेले नववर्षाच्या शुभेच्छांचे फ्लेक्स उतरवायला लावले. हौशी कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर थोरात यांनी गाडी थांबवून उतरवले. यावेळी त्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना बोलावून घेऊन फ्लेक्ससाठी नियमावली तयार करण्याच्या सूचना केल्या.
संगमनेरमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून भव्य बसस्थानक साकारले आहे. मात्र या बसस्थानकासमोर हौशी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी केली जाते. त्यामुळे बसस्थानकाचं विद्रूपीकरण होतं. संगमनेरच्या दौऱ्यावर असलेले थोरात आज बसस्थानकासमोरून जात असताना त्यांच्या ही बाब लक्षात आली. विशेष म्हणजे तिथे असलेल्या बॅनरवर त्यांचेच फोटो होते. त्यांनी गाडी थांबवून त्यांच्या फोटोचे फ्लेक्स तात्काळ उतरवण्याच्या सूचना सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना केल्या. त्यांच्या या कृतीनं काही क्षण त्यांच्या सोबत असलेले कार्यकर्तेही गोंधळले. मात्र थोरात यांनी आग्रह केल्यानं कार्यकर्त्यांनी फ्लेक्स उतरवले.
थोरात यांचे कार्यकर्ते फ्लेक्स उतरवत असताना प्रमुख अधिकारी वर्ग तेथे पोहोचला. थोरात यांनी, बॅनर्स लावण्याच्या संदर्भात नियमावली तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. बसस्थानक व्यवस्थापकांना बोलावून दंडात्मक कारवाई करण्यासही सुचवलं. याशिवाय बसस्थानकावरील अवैध व बेशिस्त पार्किंगला आळा घळण्यासाठीही ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले. थोरात यांच्या या अनपेक्षित कृतीमुळे बसस्थानक परिसर अवैध बॅनर्समुक्त झाला आहे. समाजातील सर्वच स्तरांतून या कृतीचं कौतुक होत आहे.