मंत्री दादा भुसेंची पाठिंब्यासाठी मुरकुटेंना गळ, अशोक कारखान्यावर भेट
By शिवाजी पवार | Published: April 17, 2024 03:25 PM2024-04-17T15:25:37+5:302024-04-17T15:26:27+5:30
जाहीर मेळाव्याद्वारे व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच शिर्डीत कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवू असे मुरकुटे यांचे म्हणणे आहे.
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : मंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी सायंकाळी अशोक सहकारी साखर कारखान्यावर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची अचानक भेट घेतली. शिर्डीचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना पाठिंब्यासाठी भुसे यांनी मुरकुटेंना गळ घातली. मात्र या भेटीनंतर मुरकुटे यांनी भुसे यांना आश्वासन दिलेले नाही. जाहीर मेळाव्याद्वारे व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच शिर्डीत कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवू असे मुरकुटे यांचे म्हणणे आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी मुरकुटे यांचे राजकीय वैर आहे. महायुतीच्या येथे झालेल्या मेळाव्यात विखे यांनी मुरकुटेंवर टीका केली होती. मुरकुटे यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे भुसे यांनी ही भेट घेतल्याची चर्चा आहे. यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सिद्धार्थ मुरकुटे उपस्थित होते.
माजी आमदार मुरकुटे हे बीआरएस पक्षामध्ये होते. मात्र तेलंगणामध्ये बीआरएसचा पराभव झाला. त्यानंतर मात्र मुरकुटे यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही. महायुतीचे उमेदवार लोखंडे यांना मुरकुटे यांचा पाठिंबा आवश्यक आहे. विरोधी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हेदेखील मुरकुटे यांच्या संपर्कात आहेत. तेही लवकरच मुरकुटे यांची भेट घेणार आहेत. मुरकुटे यांनीच तशी माहिती दिली.