३८ प्राथमिक शाळांना पटसंख्या घटल्याचा फटका
By Admin | Published: May 18, 2014 11:13 PM2014-05-18T23:13:21+5:302024-03-22T18:58:57+5:30
पारनेर : जिल्हा परिषदेच्या पारनेर तालुक्यातील ३८ शाळांना विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचा फटका बसला असून, यामुळे ४५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यांचे सोमवारी आॅनलाईन समायोजन होणार आहे
पारनेर : जिल्हा परिषदेच्या पारनेर तालुक्यातील ३८ शाळांना विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचा फटका बसला असून, यामुळे ४५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यांचे सोमवारी आॅनलाईन समायोजन होणार आहे. पारनेर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे ३८ प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या घटली आहे. यामध्ये पारनेर शहरासह कोहकडी व इतर गावांचा समावेश आहे. इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या शाळांमुळे पारनेर शहर व परिसरातील मराठी शाळांना फटका बसत आहे. पटसंख्या कमी झाल्याने सुमारे ४५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. आता या सर्व शिक्षकांना दुसर्या शाळेत समायोजन करावे लागणार आहे. सोमवारी पारनेर पंचायत समिती सभागृहात पंचेचाळीस शिक्षकांचे आॅनलाईन समायोजन सभापती सुदाम पवार, उपसभापती अरुणा बेलकर, गटविकास अधिकारी किरण महाजन, सर्व सदस्य, गट शिक्षणाधिकारी के.एन. पटारे आदींच्या उपस्थितीत होणार आहे. ‘गुरूकुल’चे नेते रा.या. औटी, जयप्रकाश साठे, ऐक्य मंडळाचे दादाभाऊ कोल्हे, अंबादास काकडे, ‘सदिच्छा’चे जिल्हाध्यक्ष बापू तांबे यांनी पाठपुरावा केल्याने शिक्षकांचे आधी समायोजन व नंतर प्रशासकीय बदल्या होणार आहेत. आॅनलाईन बदल्यांमुळे शिक्षकांना कोणत्याही राजकीय पदाधिकारी किंवा अधिकार्यांकडे न जाता पसंतीची शाळा मिळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)