शेवगाव तालुक्यात अल्पवयीन मुलगी, युवकाचा मृतदेह विहिरीत आढळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:51 PM2019-05-14T12:51:48+5:302019-05-14T12:52:12+5:30
तालुक्यातील हिंगणगाव-ने परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत अल्पवयीन मुलगी व एका युवकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
शेवगाव : तालुक्यातील हिंगणगाव-ने परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत अल्पवयीन मुलगी व एका युवकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि.१३) ग्रामस्थ व पोलिसांनी क्रेनच्या सहायाने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. याबाबत मयतांच्या दोन्ही कुटुंबांनी एकमेकांवर आरोप केल्याने घटनेचा तपास करून त्याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
प्रतिभा नामदेव बामदळे (वय १६), राजेंद्र परमेश्वर शिंदे (वय २७, दोघेही रा. हिंगणगाव-ने, ता. शेवगाव) अशी मयतांची नावे आहेत. हिंगणगाव-ने येथील प्रतिभा नामदेव बामदळे (वय १६) ही अल्पवयीन मुलगी गुरुवारी (दि.९ मे) शौचालयास जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. ती पुन्हा घरी आलीच नाही. तिचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. यावेळी शेजारीच राहणारा गावातील राजेंद्र परमेश्वर शिंदे (वय २७) हा सुद्धा घरी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मुलीची आई लक्ष्मी नामदेव बामदळे यांनी गुरुवारी रात्री शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र शिंदे याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास हिंगणगावच्या पूर्वेस असलेल्या संपत किसन मिसाळ यांच्या विहिरीतून कुजलेल्या अवस्थेतील दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी मोठी गर्दी झाली होती. हे प्रेमीयुगूल असल्याची परिसरात चर्चा होती. दरम्यान, या घटनेबाबत बामदळे व शिंदे या दोन्ही कुटुंबांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.
पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहायक पोलीस निरीक्षक नितीन मगर, सहायक फौजदार भाऊसाहेब गिरी, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर माळवे, पोलीस शिपाई योगेश गणगे, वैजिनाथ चव्हाण आदींनी चोख बंदोबस्त ठेवला. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस पथकाला तपासाबाबत पुढील सूचना दिल्या.