अल्पवयीन मुलीला घराबाहेर काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:24 AM2021-08-23T04:24:05+5:302021-08-23T04:24:05+5:30
अहमदनगर : अल्पवयीन मुलीला मारहाण करून घराच्या बाहेर काढलेल्या सावत्र आई व वडिलाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...
अहमदनगर : अल्पवयीन मुलीला मारहाण करून घराच्या बाहेर काढलेल्या सावत्र आई व वडिलाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललिता तिरथ दिव्यांका व तिरथ दिव्यांका (रा. तपोवन रोड) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
चाइल्ड लाइनमुळे अल्पवयीन मुलीची सावत्र आई-वडिलांच्या ताब्यातून सुटका झाली आहे. चाइल्ड लाइनचे सदस्य प्रवीण कदम यांनीच ही फिर्याद दाखल केली आहे. पाच ते सहा दिवसांपासून एक अल्पवयीन मुलगी तपोवन रोड परिसरात बेवारस अवस्थेत फिरत आहे. तिच्या शरीराला जखमा आहेत, असा फोन चाइल्ड लाइनला आला होता. चाइल्ड लाइनचे प्रवीण कदम आणि प्रियंका गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने सावत्र आई- वडिलांकडून त्रास दिला जात असल्याचे समजले. दारू पिऊन दररोज मारणे, अंगाला चटके देणे, जेवण न देणे असे प्रकार घडल्याचे तीने सांगितले. याबाबत कदम यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी उपनिरीक्षक सूरज मेढे, पोलीस कर्मचारी शिरीष तरटे, महिला कर्मचारी गहिले यांना घटनास्थळी पाठविले. चाइल्ड लाइनचे सदस्य कदम यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाइल्ड लाइनचे केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख व सदस्य बागेश्री जरंडीकर व बाल कल्याण समितीच्या आदेशाने या अल्पवयीन मुलीला स्नेहालय संचलित केडगाव येथील स्नेहांकुर या दत्तक विधान केंद्रात तात्पुरत्या स्वरूपाचा निवारा मिळवून देण्यात आला आहे.