राहुरीत होत असलेला अल्पवयीन विवाह पोलीस येताच थांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 05:34 PM2017-11-20T17:34:28+5:302017-11-20T17:39:08+5:30
राहुरी परिसरात अल्पवयीन मुला-मुलीचा विवाह होणार असल्याने गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र पोलीस, महसूल यंत्रणा व राहुरी नगर परिषदेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचताच हा विवाहसोहळा नसल्याचे सांगत संयोजकांनी माघारी घेतली. त्यामुळे अल्पवयीन मुला-मुलींचा विवाह थांबला.
राहुरी : राहुरी परिसरात मुलनमाथा येथे सोमवारी दुपारी अल्पवयीन मुला-मुलीचा विवाह होणार असल्याने गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र पोलीस, महसूल यंत्रणा व राहुरी नगर परिषदेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचताच हा विवाहसोहळा नसल्याचे सांगत संयोजकांनी माघारी घेतली. त्यामुळे अल्पवयीन मुला-मुलींचा विवाह थांबला.
संगमनेर येथील अॅड. रंजना कवांदे यांच्याकडे तक्रार आली होती. अॅड. गवांदे यांनी राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला. तहसीलदार अनिल दौंडे व राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामराव महानवार हे तातडीने विवाहस्थळी पोहोचले. मुलनमाथा परिसरात मंडप घालण्यात आला होता. दुपारी एक नंतर शुभमंगल होणार होते. वधू-वराला नवीन कपड्याचा साज चढविण्यात आला होता. भोजनाचीही तयारी करण्यात आली होती. विवाह लागण्यापूर्वीच पोलीस उपनिरीक्षक दिलीप गायकवाड, पोलीस टेमकर, मुख्याधिकारी महानवार हे विवाहस्थळी दाखल झाले. त्यांना पाहून वधुवरांच्या नातेवाईकांचे धाबे दणाणले. मुलगा १७ वर्षाचा तर मुलगी १५ वर्षाची होती. पोलिसांनी वधू-वराच्या जन्म दाखले मागितल्यानंतर नातेवाईकांनी कागदपत्र दाखविण्यास असमर्थता दर्शविला. हा विवाहसोहळा नसल्याचे सांगत वधू-वरांनी माघार घेतली. मुले अल्पवयीन असल्यामुळे त्यांचा विवाह करता येणार नाही, असे पोलिसांनी ठणकावले. वधू-वर पक्षाने हा विवाह करणार नसल्याचे सांगितले.