कुकडीचे आवर्तन ठरले मृगजळ
By Admin | Published: May 22, 2017 02:42 PM2017-05-22T14:42:03+5:302017-05-22T14:42:03+5:30
श्रीगोंदेकरांसाठी संजीवनी ठरणारे कुकडीचे आवर्तन यंदा मात्र, मृगजळ ठरले आहे़ त्यामुळे लाभक्षेत्रातील हजारो एकर फळबागांना टँकरद्वारे पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे़
आॅनलाईन लोकमत
श्रीगोंदा (अहमदनगर), दि़ २२ - श्रीगोंदेकरांसाठी संजीवनी ठरणारे कुकडीचे आवर्तन यंदा मात्र, मृगजळ ठरले आहे़ त्यामुळे लाभक्षेत्रातील हजारो एकर फळबागांना टँकरद्वारे पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे़
गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात दुष्काळामुळे फळबागा जळाल्या़ पावसाळ्यात समाधानकार पाऊस झाल्यामुळे धरणे १०० टक्के भरली़ त्यामुळे शेतीसाठी किमान तीन आवर्तने मिळतील, अशी संधी निर्माण झाली होती़ शेतकऱ्यांनीही मोठ्या आशेने पिके घेतली़ मोठ्या प्रमाणात ऊस लागवड वाढली़ तरुण शेतकऱ्यांनी फळबागांची मोठी लागवड केली़ त्यासाठी बँका, सोसायटी अशा विविध संस्थांकडून कर्ज काढले़ आता उन्हाळ्यात पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत़ मात्र, अशा परिस्थितीत कुकडीचे शेतीसाठी आवर्तन मिळावे, यासाठी शेतकऱ्यांनी मोर्चे आंदोलने केली़ मात्र, तरीही शेतीसाठी कुकडीचे आवर्तन मिळाले नाही़
काही भागात उसाचे पीक जळून गेले आहे़ लिंबोणी, डांळिब अशा फळबागा अडचणीत सापडल्या आहेत़ या फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा कर्ज काढून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला आहे़ त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे़