मिरजगाव बसस्थानकाची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:35 AM2021-02-18T04:35:37+5:302021-02-18T04:35:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कर्जत : अहमदनगर-सोलापूर महामार्गावर मिरजगाव येथे एसटी महामंडळाने बसस्थानक उभारले आहे. सर्व काम पूर्ण होऊन एक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : अहमदनगर-सोलापूर महामार्गावर मिरजगाव येथे एसटी महामंडळाने बसस्थानक उभारले आहे. सर्व काम पूर्ण होऊन एक वर्ष झाले, मात्र या इमारतीचा उद्घाटन समारंभ रखडला आहे. यामुळे जुन्या धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून थांबण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
अहमदनगर-सोलापूर महामार्गावर मिरजगाव हे महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे एसटी महामंडळाने पूर्वी उभारलेली इमारत जीर्ण झाली होती. मिरजगाव येथे अद्ययावत बसस्थानकाची इमारत उभारण्यात यावी, अशी मागणी मिरजगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कामना युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर आखाडे व किरण चुंबळकर यांनी माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे केली होती. यावरून राम शिंदे यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना मिरजगाव येथे बसस्थानकाची नवीन कामाच्या निविदा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एसटी महामंडळाने या इमारतीचा आराखडा तयार केला. यासाठी ७६ लाख रुपये मंजूर केले. यानंतर या कामाचा शुभारंभ माजी मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते झाला. मिरजगाव येथील बसस्थानक इमारतीचे काम पूर्ण होऊन एक वर्ष झाले तरी देखील या इमारतीचे उद्घाटन रखडले आहे. यामुळे मिरजगाव बसस्थानकावर आलेले प्रवासी आपला जीव मुठीत धरून येथील जीर्ण झालेल्या इमारतीत बसत आहेत. तर काही प्रवासी बसस्थानकाच्या आवारात असलेल्या झाडांचा आश्रय घेतात. एकंदरीतच प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ या ब्रीदवाक्याचा विसर एसटी महामंडळाला विसर पडला आहे. मिरजगाव येथील बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केव्हा होणार? हा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. मिरजगाव येथील नवीन बसस्थानकाच्या इमारतीचे उद्घाटन तातडीने करावे, अशी मागणी मिरजगाव भाजपचे शहराध्यक्ष कैलास बोराडे यांनी केली आहे.
...
बसस्थानकात प्रशस्त सुविधा
मिरजगाव बसस्थानकाच्या नवीन इमारतीत स्थानक प्रमुखासाठी प्रशस्त कॅबिन, चार व्यापारी गाळे, प्रवाशांना बसण्यासाठी प्लॅटफॉर्म, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महिला व पुरुषांसाठी शौचालयाची सोय, स्वच्छतागृहे, प्रशस्त मैदान अशा सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
..
मिरजगाव बसस्थानकाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. पण ते केव्हा सुरू होईल याबाबत आम्हाला काही सांगता येणार नाही. नाशिक येथील कार्यालयात याबाबत माहिती मिळेल.
-विजय गिते, विभाग नियंत्रक, अहमदनगर.
...