मिरजगाव, जामखेड दरोड्यातील गुन्हेगार जेरबंद; चोरीतील दोन लाख हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 03:56 PM2020-06-26T15:56:56+5:302020-06-26T15:57:09+5:30
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे दरोडा घालणारे सराईत गुन्हेगार व जामखेडमध्ये घरफोडी करून पाच लाखांचा ऐवज पळवणा-या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी जेरबंद केले आहे. जामखेडच्या गुन्हेगारांकडून २ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे दरोडा घालणारे सराईत गुन्हेगार व जामखेडमध्ये घरफोडी करून पाच लाखांचा ऐवज पळवणा-या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी जेरबंद केले आहे. जामखेडच्या गुन्हेगारांकडून २ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
मिरजगाव येथील मधुकर विठ्ठल कोरडे यांच्या घरी २३ जून रोजी दरोडा पडला होता. कोरडे हे त्यांच्या पत्नीसह घरामध्ये झोपलेले असताना अनोळखी गुन्हेगारांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. कोरडे पती-पत्नीला तलवारीचा धाक दाखवून व जिवे मारण्याची धमकी देऊन घरातील कपाटामध्ये असलेले ३ लाख ५०० रूपयांचे दागिने चोरुन नेले.
याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात कोरडे यांनी फिर्याद दिली होती. कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन वेगवेगळी पथके तयार केली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कर्जत तालुक्यातील बेलगाव येथे सापळा लावण्यात आला. पोलीस आल्याचे पाहून आरोपी पळाले, मात्र पोलिसांनी पाठलाग करून आरोपी युवराज उर्फ धोडीराम ईश्वर भोसले (वय २३), सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले (वय २५ वर्ष, दोघेही रा . बेलगाव, ता. कर्जत), तसेच देवीदास उर्फ देवड्या अभिमान काळे (वय २८, रा . हरिनारायण आष्टा , ता . आष्टी) यांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. साथीदार आरोपींचा शोध घेण्यात आला, परंतु ते मिळून आले नाहीत.
या तीनही आरोपींवर आष्टी, कर्जत, सांगोला, अंभोरा, पाथर्डी आदी पोलीस ठाण्यात १० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.