मिरजगावच्या युवा वैज्ञानिकाचा अटकेपार झेंडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:50 PM2019-08-04T13:50:19+5:302019-08-04T13:50:24+5:30
आॅस्ट्रेलियातील सिडनी येथे मार्च २०२० मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवा अणुविद्दुत परिषदेत कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील युवा वैज्ञानिक ज्ञानेश्वर अवसरे यांना शोधनिबंध सादर करण्याची संधी मिळाली आहे.
मच्छिंद्र अनारसे
कर्जत : आॅस्ट्रेलियातील सिडनी येथे मार्च २०२० मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवा अणुविद्दुत परिषदेत कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील युवा वैज्ञानिक ज्ञानेश्वर अवसरे यांना शोधनिबंध सादर करण्याची संधी मिळाली आहे.
ही परिषद प्रत्येक दोन वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवली जाते. या परिषदेमध्ये अनेक विद्यार्थी व तरुण संशोधक अणुऊर्जा क्षेत्रातील शोधनिबंध सादर करतात. आपल्या देशातून केवळ अवसरे यांचीच निवड झाली. तरुण पिढीला ऊर्जेचे फायदे समजावणे, त्याबद्दलच्या गैरसमजुती दूर करून त्यांना या क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय युवा अणुविद्दुत परिषद जगभरात काम करते. जगातील बहुतांश देश या परिषदेचे सदस्य आहेत. भारतासारख्या विकसनशील देशाला प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणात विजेची (ऊर्जेची) आवश्यकता आहे. ही गरज अणुऊर्जा बºयाच प्रमाणात भागवू शकते. या क्षेत्रात तरुण पिढीला रोजगाराच्या, संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. जानेवारी २०१९ पासून अबूधाबी, संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ४ अणुभट्ट्या बनवून दिल्या आहेत. अणु केंद्रामध्ये ज्ञानेश्वर लक्ष्मण अवसरे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम पाहत आहेत. यापूर्वी २००८ पासून अवसरे भारतीय अणु ऊर्जा विभागाच्या तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या मुख्य नियंत्रण कक्षात नियंत्रण अभियंता म्हणून काम केले आहे. शेतकरी कुटुंबातील खडतर परिस्थिती, कोणाचेही मार्गदर्शन नसताना ज्ञानेश्वर अवसरे यांनी जामखेड तालुक्यातील अरणगाव जवळील मळई शाळेत मराठी माध्यमामधून शिक्षण घेतले.
जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील श्री अरण्येश्वर विद्यालयात त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. दहावीत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर कर्जत येथील महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेजमधून १२ वी झाले. पुढे डॉ. बाबसाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (जि. रायगड) येथून रसायन अभियांत्रिकीमधून बी टेकची पदवी मिळविली. २००७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून राज्यपालांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले होते. बी टेकच्या शेवटच्या वर्षात शिकत असताना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये पुण्यातील प्राज इंडस्ट्रीज येथे प्रोसेस इंजिनिअर पदावर निवड झाली. त्यानंतर २००८ साली भारतीय अणुऊर्जा महामंडळामध्ये वैज्ञानिक अधिकारीपदी त्यांची निवड झाली.
पुढे तारापूर अणुऊर्जा केंद्रात काम करत असताना भाभा अणुसंशोधन केंद्राशी संलग्न असलेल्या डॉ. होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटमधून एमटेक नुक्लिअर इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंटची पदवी मिळवली. शेतकरी कुटुंबात जन्म झाला. आर्थिक स्थिती हालाखाची होती. त्यामुळे लहानपणापासून शेतातील सर्व कामे करणे, सुट्ट्यांमध्ये वडिलांबरोबर बांधकाम करणे, विहिरी वरील क्रेन चालवणे, पाइपलाइन खोदणे अशी अनेक कामे त्यांना करावी लागली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी परिस्थितीचा बाऊ न करता आपले ध्येय निश्चित करावे. कठोर परिश्रम घ्यावेत. यश नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या यशात आई-वडिलांचा मोलाचा वाटा असल्याचे ज्ञानेश्वर अवसरे यांनी सांगितले.