टोमॅटोविषयी गैरसमज पसरवू नयेत; डॉ. बी.एन.एस.मूर्ती, डॉ.अजित नवले यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 12:07 PM2020-05-16T12:07:21+5:302020-05-16T12:08:22+5:30
अकोले : टोमॅटोवर आलेला रोग आणि कोविड-१९ याचा दुरान्वये कोणताही संबंध नाही. आजपर्यंत कोणत्याही वनस्पतीवरील विषाणूंचा परिणाम माणसावर होत नाही. कारण त्यांच्याकडे अशा संसर्गाचे रिसेप्टस नसतात, असा निर्वाळा देत टोमॅटोविषयी गैरसमज पसरू नये, असे आवाहन फलोत्पादन आयुक्त डॉ. बी.एन.एस.मूर्ती व माकप किसान सभेचे राज्य सचिव डॉ.अजित नवले यांनी केले आहे.
हेमंत आवारी /
अकोले : तालुक्यात टोमॅटो पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिक धोक्यात आले आहे. यात शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. मात्र टोमॅटोवर आलेला रोग आणि कोविड-१९ याचा दुरान्वये कोणताही संबंध नाही. आजपर्यंत कोणत्याही वनस्पतीवरील विषाणूंचा परिणाम माणसावर होत नाही. कारण त्यांच्याकडे अशा संसर्गाचे रिसेप्टस नसतात, असा निर्वाळा देत टोमॅटोविषयी गैरसमज पसरू नये, असे आवाहन फलोत्पादन आयुक्त डॉ. बी.एन.एस.मूर्ती व माकप किसान सभेचे राज्य सचिव डॉ.अजित नवले यांनी केले आहे.
टोमॅटो बाधित करणा-या विषाणूची तपासणी व्हावी म्हणून फळ, पान आणि बियाणे बेंगलोरच्या इंडियन कौन्सिल अॅग्रीकल्चर रिसर्च (आयसीएआर) संस्थेकडे पाठविण्यात आले आहे. टोमॅटोवरील न्यू तिरंगा विषाणू असे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावर डॉ. मूर्ती, डॉ. नवले यांनी शनिवारी याविषयी एका पत्रकाव्दारे हे आवाहन केले आहे. टोमॅटोला कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झाला हे राष्ट्रीय संशोधन संस्थांद्वारे फास्ट्राक मोडमध्ये शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. फळे खाण्यामुळे कोरोना विषाणूपेक्षा बरीच गुंतागुंत उद्भवू शकते? हे चुकीचे आहे. आजपर्यंत कोणत्याही वनस्पती विषाणूंचा परिणाम माणसावर होत नाही. कारण त्यांच्याकडे अशा संसर्गाचे रिसेप्टर्स नसतात. जगातील लोक आधीच तणावग्रस्त आहेत. त्यात गैरसमज होईल आणि शेतीचे नुकसान होईल, अशा बातम्या पसरवू नये असे पत्र फलोत्पादन आयुक्त डॉ.मूर्ती यांनी केले आहे.
टॉमेटो पिकावर आलेल्या विषाणूजन्य आजाराचा संबंध मानवी आजाराशी जोडून काही जण अफवा पसरवत आहेत. संबंधितांनी हे प्रकार तातडीने थांबवावेत, असे आवाहन किसान सभा चे डॉ.नवले यांनी केले आहे.
कृषी विभाग प्रयत्नशील
वनस्पती बाधक विषाणू व प्राणी बाधक विषाणू या संपूर्ण वेगवेगळ्या प्रजाती आहेत. वनस्पती किंवा टोमॅटोला बाधित करणा-या विषाणूमुळे माणसे आजारी पडण्याची घटना समोर आलेली नाही. टोमॅटोवर आलेल्या विषाणूमुळे माणसे आजारी पडल्याची बाब कोठेही घडलेली नाही. टॉमेटो पिकावर आलेल्या विषाणूची ओळख पटविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. निष्कर्षांची माहिती तातडीने सार्वत्रिक करून पिक रोगावरील उपचाराबाबत शेतक-यांना मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन किसान सभेचे डॉ.अशोक ढवळे, जे.पी.गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, डॉ.अजित नवले यांनी केले आहे.