खोटे दागिने गहाण ठेवून बँकेला फसविले : श्रीरामपूर जिल्हा बँकेच्या दोन शाखांमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 11:39 AM2019-05-14T11:39:13+5:302019-05-14T11:39:17+5:30
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या श्रीरामपूर येथील दोन शाखांमध्ये बँकेच्या व्हॅल्युअर व कर्जदारांनी संगनमताने खोटे दागिने गहाण ठेवून कर्ज उचलून बँकेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली.
श्रीरामपूर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या श्रीरामपूर येथील दोन शाखांमध्ये बँकेच्या व्हॅल्युअर व कर्जदारांनी संगनमताने खोटे दागिने गहाण ठेवून कर्ज उचलून बँकेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सराफासह २४ जणांविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मात्र बँकेची किती रुपयांची फसवणूक झाली याची निश्चित आकडेवारी समजू शकली नाही.
बँकेचे शाखाधिकारी विलास कसबे (रा.शिरसगाव) यांनी शनिवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जिल्हा सहकारी बँकेच्या श्रीरामपूर शाखेत गोल्ड व्हॅल्युअर म्हणून रामेश्वर कचरु माळवे व शिवाजी रोड शाखेत अशोक कचरु माळवे हे दोघे बंधू काम पहात होते. शहर शाखेचे शाखाधिकारी ज्ञानदेव काळे यांच्या काळात १७ व शिवाजी रोड शाखेत शाखाधिकारी सदाशिव गोसावी यांच्या काळात ५ कर्जदारांनी सोनेतारण कर्ज घेतले. २२ जणांचे सोनेतारण कर्ज थकल्यामुळे बँकेच्या दोन्ही शाखांनी कर्जदारांकडून कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरु केली. काही कर्जदारांनी कार्यवाहीनंतर कर्ज भरले.
काहींनी कर्ज भरले नाही. त्यांना बँकेने नोटिसा पाठविल्या. ३० जानेवारी २०१९ ला सोने कर्जाच्या वसुलीसाठी दागिन्यांचा लिलाव पुकारण्यात आला. बँकेने पत्र देऊनही वरील माळवे गोल्ड व्हॅल्युअर अनुपस्थित राहिले. त्यामुळे लिलाव रद्द झाला. पुन्हा लिलाव पुकारण्यात आला. त्यावेळी दोघे अनुपस्थित राहिले. १० जानेवारी २०१९ रोजी नगरला बँकेच्या मुख्य कार्यालयात लिलाव झाला. यावेळी दागिन्यांच्या सर्व पिशव्या उघडण्यात आल्या. त्यातील दागिन्याच्या वजनात मोठी तफावत असल्याचे निष्पन्न झाले. गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदारांनी संगनमताने बँकेची फसवणूक केल्याचे उघड झाले.
प्रकरणी माळवे बंधू तसेच भारती प्रदीप करंडे, रेश्मा इसाक पटेल, लता प्रभाकर गोरे, असमा रिजवान शेख, संपत सावळेराम माने, खंडेराव सरोदे, सुनील खंडेराव सरोदे, कांचन अशोक माळवे, पल्लवी राजन माळवे, अभिषेक राजन माळवे, जितेश प्रकाश खैरे, राजेंद्र बबनराव आंबीलवादे, कैलास हुरे, ज्ञानेश्वर भास्कर सोनार, योगेश सुभाष चिंतामणी, लक्ष्मण पांडुरंग पटारे, शौकत साहेबखान पठाण, प्रकाश नारायण खैरे, राजेश भास्कर वाव्हळ, हेमंत अमृतलाल सोलंकी, सीमा अनिल आनंद यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. माळवे बंधू गेल्या सहा महिन्यापासून फरार झाले आहेत. पोलीस त्यांच्या शोधात आहेत.