मुंबईच्या बाहेर या आणि...; थोरातांना पराभूत करणाऱ्या आमदाराचा राज ठाकरेंवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 10:18 IST2025-02-03T10:17:36+5:302025-02-03T10:18:57+5:30
संगमनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांनी काँग्रेस नेते थोरात यांचा पराभव केला होता.

मुंबईच्या बाहेर या आणि...; थोरातांना पराभूत करणाऱ्या आमदाराचा राज ठाकरेंवर पलटवार
MNS Raj Thackeray: "राजसाहेब मुंबईच्या बाहेर या, संगमनेर पाहा, संगमनेरच्या जनतेला परिवर्तन हवे होते. मतांच्या माध्यमातून जनतेने परिवर्तन करून दाखविले. हे सत्य तुम्हाला समजेल. बाकी कोणाच्या तरी सांगण्यावरून पराभवाचे विश्लेषण करण्यापेक्षा बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाची खरी कारणे समजून घेण्यासाठी तुम्हाला मी संगमनेरमध्ये आमंत्रित करतोय," अशी पोस्ट सोशल मीडियाद्वारे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनी केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबई येथील मेळाव्यात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी विशेषतः काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या अनपेक्षित पराभवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच संशय व्यक्त केला होता. संगमनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांनी काँग्रेस नेते थोरात यांचा पराभव केला होता.
ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आमदार खताळ यांनी पोस्ट केली आहे. राजसाहेब, संगमनेरच्या जनतेने पाणीटंचाई, बेरोजगारी, अपूर्ण विकास आणि जनतेकडे दुर्लक्ष यामुळेच ४० वर्षापासून निवडून दिलेल्या बाळासाहेब थोरात यांना नाकारले आहे. ४० वर्ष आमदार, १७ वर्ष मंत्री असूनही तालुक्यात साधी एमआयडीसी नाही, शेतीला पाणी नाही, मग जनतेने मते का द्यावी?, असेही पोस्टमध्ये म्हटले आहे. संगमनेरच्या या जय पराजयाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी उडी घेतल्याने हा मुद्दा राज्यस्तरावर चर्चेला जात आहे. ठाकरे यांना प्रतिउत्तरादाखल आमदार अमोल खताळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पुर्ण राज्याचे लक्ष संगमनेरकडे लागले आहे.
"ईव्हीएम नव्हे, हा जनतेचा विजय"
"ईव्हीएम नव्हे, हा जनतेचा विजय आहे. राज ठाकरे यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांनी संगमनेरमध्ये येऊन पाहावे. संगमनेर तालुक्यातील जनतेचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची गेल्या ४० वर्षात सोडवणूक झालेली नाही. जनता घराणेशाहीला वैतागली होती. तालुक्यात पाणी प्रश्न बिकट आहे, हे पाहण्यासाठी राज ठाकरे यांनी संगमनेरमध्ये यावे, त्यांचे संगमनेरमध्ये स्वागतच आहे," असं आमदार खताळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.