आमदार जयकुमार गोरे विखेंच्या ताफ्यात ? संगमनेरात भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 06:50 PM2019-05-29T18:50:43+5:302019-05-29T18:51:19+5:30
भाजप प्रवेशाच्या वाटेवर असलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांच्या समवेत भाजपमध्ये आणखी कोण आमदार प्रवेश करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
लोणी : भाजप प्रवेशाच्या वाटेवर असलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांच्या समवेत भाजपमध्ये आणखी कोण आमदार प्रवेश करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी काँग्रेसचे माणखटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी राधाकृष्ण विखे यांची संगमनेरमध्ये अचानक भेट घेतली. विशेष म्हणजे संगमनेर ते आश्वी असा प्रवासही या एकाच गाडीत केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दोनच दिवसापूर्वी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी संगमनेरमध्येच भाजप प्रवेशाबाबत सूचक वक्तव्य करून काँग्रेसला धक्का दिला होता. राधाकृष्ण विखे जो निर्णय घेतील, त्यासोबत आम्ही राहू असे जाहीर वक्तव्य करून अन्य आमदारही प्रवेशासाठी तयार असल्याचे आमदार सत्तार यांनी बोलून दाखविले होते. याच पार्श्वभूमीवर विखे आणि आमदार गोरे यांची संगमनेरमध्ये झालेली भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.
मुंबईहून बुधवारी सकाळी विखे यांचे संगमनेर शहरात आगमन झाले. शहरातील व्यापाऱ्यांनी यावेळी विखे पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. या स्वागत भेटीत राजकीय गप्पाही रंगल्या. त्यानंतर विखे व गोरे यांनी संगमनेर ते आश्वी दरम्यान एकाच गाडीतून प्रवास केला. या प्रवासात कोणती राजकीय खलबते झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे. असे असले तरी ही भेट काँग्रेसची चिंता वाढविणारी आहे. सत्तार आणि आमदार गोरे या दोघांनीही विखे यांची भेट घेण्यासाठी संगमनेरच का निवडले? याचीही चर्चा राजकीय गोटात आहे.