आमदार निलेश लंकेचं उपोषण, नगर-पाथर्डी बंद; उपोषणात गायलं भजन
By सुदाम देशमुख | Published: December 8, 2022 11:45 AM2022-12-08T11:45:53+5:302022-12-08T11:47:05+5:30
नगर-पाथर्डी व नगर- मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेमुळे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
अहमदनगर: जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याने शेकडो लोकांचे अपघातात बळी गेले आहेत. रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आमदार निलेश लंके यांनी केला आहे. आमदार लंके यांचे बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयसमोर उपोषण सुरू आहे. दरम्यान उपोषणाऔ बुधवारी रात्री भजन झाले. त्यातही आमदार लंके सहभागी झाले होते.
नगर-पाथर्डी व नगर- मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेमुळे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज गुरुवारी पाथर्डी, शेवगाव, नगर तालुक्यात बंद पुकारण्यात आला आहे . प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील महिला गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात येणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. बायपास रोडवर, नगर-मनमाड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महामार्गावरील अपघातात ज्या नागरिकांना जीव गमावा लागला त्यांचे नातेवाईकही नगरच्या उपोषणास सहभागी होणार आहेत. मंगळवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या पाथर्डीच्या अभियंता स्मिता पवार यांनी भेट घेऊन उपोषण थांबवण्याचे आवाहन केले, मात्र तुमचे वरिष्ठ कोठे आहेत?, महामार्गाचे काम सुरू होईपर्यंत उपोषण थांबणार नाही असे सांगत लंके यांनी चर्चेस नकार दिला. रात्री उपोषण उशिरापर्यंत उपोषण स्थळी भजन सुरू होते. या भजनामध्ये आमदार लंके हेही सहभागी झाले होते.