आमदार निलेश लंके यांचा ऑनलाइन शिक्षणाचा पारनेर पॅटर्न : मोबाईल अॅप सांगणार विद्यार्थ्यांनी अभ्यास केला की नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 02:34 PM2020-07-24T14:34:52+5:302020-07-24T14:35:47+5:30
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे बंद असलेले शिक्षण सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी व आमदार निलेश लंके प्रतिष्ठानने तयार केलेला ऑनलाइन शिक्षणाचा पारनेर पॅटर्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलाच भावला.
पारनेर : कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे बंद असलेले शिक्षण सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी व आमदार निलेश लंके प्रतिष्ठानने तयार केलेला ऑनलाइन शिक्षणाचा पारनेर पॅटर्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलाच भावला. पवार यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क करुन याचा फायदा राज्यातील विद्यार्थ्यांना करुन देण्याची अपेक्षा व्यक्त केली. ऑनलाइन शाळा या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अभ्यास केला किंवा नाही, हेही शिक्षकांना तपासता येणार आहे.
तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्या सहकार्यातून ऑनलाइन शिक्षणासाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. याची माहिती आमदार लंके यांनी गुरूवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पवार यांची भेट घेऊन दिली. तब्बल अर्धा तास विविध बाबींची माहिती घेतल्यानंतर पवार यांनी यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क करून विषय समजावून घेण्याच्या सूचना दिल्या. या सॉफ्टवेअरचा फायदा राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्याकडून तांत्रिक माहिती घेतल्यानंतर पवार यांनी शिक्षण क्षेत्रातील जाणकारांशीही चर्चा केली. प्रत्यक्ष शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण देताना काय अडचणी येतात, त्या कशा सोडविल्या, याची विचारणाही पवारांनी केली. यापूर्वी विविध शिक्षक व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देत होते. परंंतू दिलेला अभ्यास विद्यार्थ्यांनी केला किंवा नाही, हे समजत नव्हते. नव्याने विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये विद्यार्थ्यांने किती प्रश्नांचा अभ्यास केला, किती विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आॅनलाईन हजेरी लावली, विद्यार्थ्यास एखाद्या विषयाचे किती आकलन झाले याची संपूर्ण माहिती या सॉफ्टवेअरमध्ये असल्याचे लंके यांनी पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही तात्काळ वेळ देत विषय समजावून घेतला. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना या उपक्रमाची माहिती देण्याच्या सूचना करतानाच या उपक्रमासंदर्भात पुणे येथे शिक्षण संचालक तसेच शिक्षण आयुक्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यासंदर्भातही मंत्री गायकवाड यांनी सूचना दिल्या. बैठकीचा दिवस निश्चित झाल्यानंतर आ. लंके व शिक्षक गुंड हे या बैठकीस उपस्थित राहून या सॉफ्टवेअरसंदर्भात सविस्तर माहिती देणार आहेत.
पारनेर पॅटर्नकडे राज्याचे लक्ष!
डिजिटल स्कूल क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या संदीप गुंड यांनी आमदार निलेश लंके यांनी हाती घेतलेल्या उपक्रमात सहभाग नोंदविल्याने ऑनलाइन शाळेच्या पारनेर पॅटर्नकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. डिजिटल शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुंड यांना तिन वेळा राष्ट्रपतींकडून गौरविण्यात आले असून असा गौरव होणारे गुंड हे देशातील एकमेव प्राथमिक शिक्षक आहेत.