आमदार नितेश राणेंच्या वक्तव्याचा महापालिका कर्मचाऱ्यांकडून निषेध: दिवसभर काम ठेवले बंद
By अरुण वाघमोडे | Published: April 19, 2023 04:13 PM2023-04-19T16:13:49+5:302023-04-19T16:14:28+5:30
आम्ही हे सहन करणार नाही.
अहमदनगर: आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी नगर शहरात येऊन महापालिका आयुक्तांना शिविगाळ करत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मनपा कर्मचारी संघटनेेने आक्रमक पवित्रा घेत निषेध सभा घेतली तसेच बुधवारी दिवसभरासाठी प्रभाग कार्यालयांसह मुख्य कार्यालयातील अत्यावश्यक सेवा वगळता कामकाज बंद ठेवले.
महापालिकेत बुधवारी ११ वाजता झालेल्या निषेध सभेला मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंद वायकर, उपाध्यक्ष राहुल साबळे आदींसह मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना लोखंडे म्हणाले आमदार राणे यांना आयुक्तांच्या कामकाजाबाबत काही आक्षेप असेल त्यांनी कायदेशीर मार्गाने तक्रार करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी शिविगाळ करत आक्षेपार्ह भाषा वापरली. महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून वातावरण दूषित करण्याचे काम ते करत आहेत. नगर शहरात कुणीही येऊन मनपाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिविगाळ करत असेल ते सहन केले जाणार नाही. अशा लोकांना धडा शिकविण्याची ताकद संघटनेत आहेत. निवडणुकीपूर्वी धार्मिक तेढ निर्माण करून काही राजकीय पुढाऱ्यांचा शहरात दंगल घडविण्याचा उद्देश आहे.
शहराची वैचारिक उंची मात्र मोठी आहे. येथे सामाजिक सलोख्याचे वातावरण आहे. राजकीय पुढाऱ्यांनी हे वातावरण खराब करू नये. आमदार राणेंना शहरातील प्रश्न मार्गी लावायचे असतील तर मनपा कर्मचाऱ्यांचे ११ कोटींचे वेतन शासनाने थकविले आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावावा. विनाकारण शिविगाळ करू नये, अन्यथा आम्ही हे सहन करणार नाही. आनंद वायकर यांनीही राणेंच्या व्यक्तव्यावर टीका करत निषेध केला. यावेळी नाना देशमुख, वसंत थोरात, नंदाताई भिंगारदिवे, के.के जाधव, रंगनाथ गावडे, सुरेश इथापे, परिमल निकम, रोहिदास सातपुते, शेखर देशपांडे, किशोर कानडे, नागेश्वर पवळे, गुलाब गाडे, नंदू नेमाने, अमोल लहारे आदींसह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"