नगरमध्ये कायदा-सुव्यवस्था आहे का? आमदार संग्राम जगताप भडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 03:36 PM2020-12-03T15:36:47+5:302020-12-03T15:37:24+5:30
जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरलेला नाही. कायदा सुव्यवस्था हा प्रकार येथे आहे का? असा संतप्त सवाल आमदार संग्राम जगताप यांनी थेट पालकमंत्र्यांनाच केला.
अहमदनगर : नगर जिल्ह्यात परवा महिलेची हत्या झाली. थेट सुपारी देण्यापर्यंत लोकांची मजल गेली आहे. याशिवाय दिवसाढवळ्या शहरातील नागरिकांची घरे फोडली जातात. केडगावात चोºयांचे प्रमाण एवढे वाढले आहे की स्वत:लाच स्वत:चे संरक्षण करण्याची वेळ आली आहे. म्हणजे या शहरात, जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरलेला नाही. कायदा सुव्यवस्था हा प्रकार येथे आहे का? असा संतप्त सवाल आमदार संग्राम जगताप यांनी थेट पालकमंत्र्यांनाच केला.
गुरूवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी शहरातील कायदा-सुव्यवस्था व महापालिका प्रशासनाच्या कारभारावर आ. जगताप यांनी ताशेरे ओढले. सुपारी देऊन हत्या करण्यापर्यंतच्या घटना या शहरात सुरू आहेत. दिवसाढवळया दरोडेखोर घरे फोडतात. केडगावात गेल्या महिन्यापासून चोºयांचे प्रकार होत आहेत. पोलीस दखल घेत नाहीत म्हणून तरूणच दिवसा-रात्री गस्त घालतात. शहरात काल एका ठिकाणी चोरी झाली तर फिर्याद न देण्याचा सल्ला पोलिसांनी संबंधितांना दिला. म्हणजे या शहरात पोलिसांचा काही धाक आहे की नाही, असा सवाल जगताप यांनी पालकमंत्र्यांना विचारला. महापालिका हद्दीतील मोकाट जनावरांचे प्रश्न, रस्त्याचा प्रश्न याबाबत कित्येक दिवसांपासून पाठपुरावा करूनही आयुक्त दखल घ्यायला तयार नाहीत, अशी तक्रार त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.