आमदार शिवाजी कर्डिले यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 04:09 PM2018-04-13T16:09:15+5:302018-04-13T16:32:02+5:30
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलीस कोठडीची आज मुदत संपल्याने पोलीसांनी कर्डिले यांना न्यायालयात हजर केले होते.
अहमदनगर - पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलीस कोठडीची आज मुदत संपल्याने पोलीसांनी कर्डिले यांना न्यायालयात हजर केले होते. या सुनावणीअंती न्यायालयाने आमदार कर्डिले यांच्यासह इतर १७ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली तर याप्रकणात काल अटक केलेल्या चार आरोपींना १६ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.याप्रकरणी पोलीसांनी लोकसेवकास पळवून नेणे. पोलीसांची विनंती धुडकावणे तसेच चिथावणी देण्याची भादवि २२५, १५२ व १०९ ही कलमे वाढविले आहेत.
पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणी कर्डिले यांना सोमवारी(दि.८ एप्रिल) रोजी अटक झाली होती. त्यानंतर मंगळवारी कर्डिले यांच्याविरोधात भा.द.वि.३०८ हे कलम (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे) वाढविण्यात आले होते. त्यामुळे कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत वेळोवेळी वाढ करण्यात आली होती. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलीसांनी कर्डिले यांना पुन्हा न्यायालयात हजर केले होते. काल अटक केलेल्या काशिनाथ बबन शिंदे, मयुर कटारिया, सिध्दार्थ शेलार व संजू दिवटे यांना १६ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी शनिवारी रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले असताना राष्ट्रवादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते कार्यालयात दाखल झाले. या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कायार्लायवर दगडफेक करुन, कार्यालयाचे दरवाजे लाकडी दांडक्याने तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकास करुन अनधिकृतरित्या कार्यालयात प्रवेश केला व बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता. याप्रकरणी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.