जिल्हा परिषद सदस्याच्या पायावर आमदार विजय औटींच्या गाडीचे चाक गेल्याने झाली दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 07:18 PM2018-02-27T19:18:54+5:302018-02-27T20:07:46+5:30
जिल्हा परिषद सदस्याच्या पायावर आमदार विजय औटींच्या गाडीचे चाक गेल्याने ही दगडफेक झाली. यात सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यासह एक शिवसैनिक जखमी झाला आहे.
पारनेर (अहमदनगर) : शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या ताफ्यामध्ये असणा-या आमदार विजय औटी यांच्या वाहनावर दगडफेक केल्याचा प्रकार मंगळवारी पारनेर येथे घडला. जिल्हा परिषद सदस्याच्या पायावर आमदार विजय औटींच्या गाडीचे चाक गेल्याने ही दगडफेक झाली. यात सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यासह एक शिवसैनिक जखमी झाला आहे.
पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार विजय औटी यांचा अभीष्टचिंतन सोहळा मंगळवारी सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते पारनेर येथे आयोजित केला होता.
आपले भाषण संपवून ठाकरे सभास्थानाहून आपल्या वाहनात बसले. त्याचवेळी सेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके यांच्या समर्थकांनी घोषणबाजी करून उध्दव ठाकरे यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. त्या वाहनाला गराडा घातला जात असतानाच त्याच ताफ्यात असणारी आमदार औटी यांची गाडी गर्दीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न वाहनाचा चालक करीत होता. त्या वाहनाचे चाक सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या पायावर गेले तर सेनेचे उपनेते अनिल राठोड थोडक्यात बचावले.
याच गोंधळात लंके समर्थकांनी आमदार औटी यांच्या वाहनाला लक्ष्य करून गाडीवर दगडफेक केली. आमदार विजय औटी यावेळी वाहनात नव्हते तर ते व्यासपीठावर होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून लंके समर्थकांना दूर लोटले तर सेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके हे तेथून निघून गेले. दरम्यान लंके समर्थकांनी तेथे उपस्थित राहून घोषणाबाजी सुरूच ठेवली होती. या प्रकाराची सेनेकडून गंभीर दखल घेण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.
संदेश कार्ले जखमी
सेनेचे नगरचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या पायावरून गाडी गेल्याने ते जखमी झाले आहेत. तर प्रितेश पानमंद या शिवसैनिकाच्या डोक्याला दगड लागल्यामुळे तो जखमी झाला आहे. या प्रकारानंतर सेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाहनावर दगडफेक झाली नसल्याचे म्हटले असून दुसरे वाहन अंगावर आल्याने हा प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
दगडफेक नेमकी कोणत्या गटाने केली?
आमदार विजय औटी यांच्या गाडीचे चाक जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या पायावरुन गेले. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी दगडफेक केली. ही दगडफेक नेमकी कोणत्या गटाने केली, हे अद्याप उघड झालेले नाही.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके यांच्या गटाने ही दगडफेक केल्याचे औटी यांचा गट सांगत आहे तर लंके यांचा गटाकडून हा आरोप फेटाळण्यात आला आहे. ज्या बाजून लंके व त्यांचे समर्थक उभे होते, त्याच्याविरुद्ध बाजुने ही दगडफेक करण्यात आली. त्यात लंके यांचा समर्थक असलेल्या प्रितेश पानमंद या तरुणाचे डोके फुटले आहे.