मनपा पथदिवे घोटाळा : सातपुतेच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 06:37 PM2018-05-24T18:37:54+5:302018-05-24T18:38:01+5:30
महानगरपालिकेच्या पथदिवे घोटाळ्यातील मुख्य आरोपी पालिकेतील विद्युत विभागाचा प्रमुख रोहिदास सातपुते याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली.
अहमदनगर : महानगरपालिकेच्या पथदिवे घोटाळ्यातील मुख्य आरोपी पालिकेतील विद्युत विभागाचा प्रमुख रोहिदास सातपुते याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली.
महापालिकेत संगनमताने ३४ लाख रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. परंतु गेल्या चार महिन्यांपासून यातील मुख्य आरोपी रोहिदास सातपुते फरार होता. सोमवारी (दि. २१) तो स्वत: पोलिसांत हजर झाला. त्यानंत न्यायालयाने त्याला दि. २४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान पोलिसांनी त्याला महापालिकेत नेऊन तपास केला.
दरम्यान, गुरूवारी त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने या प्रकरणातील तपासी अधिकारी सुरेश सपकाळे यांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले. या घोटाळयातील महत्त्वाच्या फायली सातपुते याने गायब केल्या आहेत़ बिले काढताना बनावट स्वाक्षरी, शिक्के याचा वापर झाला आहे़ या घोटाळ्यात आणखी कुणाचा समावेश आहे, याचा तपास करावयाचा असल्याने सातपुते याच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी सपकाळे व सरकारी वकिलांनी केली. हा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायाधीश श्रीपाद देशपांडे यांनी सातपुतेला दि. २६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.