मनसेच्या दोघांना सांभाळण्याची कसरत
By Admin | Published: May 15, 2016 11:58 PM2016-05-15T23:58:40+5:302016-05-16T00:09:07+5:30
अहमदनगर : महापौरपदाच्या निवडणुकीसाठी मनसेच्या दोन नगरसेवकांना सांभाळण्याची कसरत सभापती तथा पक्षाचे गटनेते गणेश भोसले यांना करावी लागत आहे.
अहमदनगर : महापौरपदाच्या निवडणुकीसाठी मनसेच्या दोन नगरसेवकांना सांभाळण्याची कसरत सभापती तथा पक्षाचे गटनेते गणेश भोसले यांना करावी लागत आहे. दोघांनाही स्थायी समितीचे सभापती पद पाहिजे असल्याचा अट्टाहास कायम असल्याने ते मिळाले नाहीतर काय? या प्रश्नामुळे सुवर्णा जाधव, विणा बोज्जा या दोन नगरसेविकेंच्या भूमिकेकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.
महापालिकेत मनसेचे चार नगरसेवक आहेत. त्यातील किशोर डागवाले यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर तिघे शिल्लक राहिले. गटनेते गणेश भोसले यांच्याकडे स्थायी समितीचे सभापतीपद आहे. फेब्रुवारी महिन्यातच त्यांच्या सभापती पदाची मुदत संपली.
नगरसेविका सुवर्णा जाधव, विणा बोज्जा यांना सभापती पदाची आस लागून आहे. भोसले यांनी राजीनामा न दिल्याने हे पद त्यांना मिळू शकले नाही. भोसले यांच्या राजीनाम्यानंतरच सभापती पदाची निवडणूक होईल.
महापौर पद निवडणुकीपूर्वी स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक झाली तर स्वपक्षातील नगरसेवक नाराज होतील, त्यातून सत्ता जाण्याची भिती असल्याने सत्ताधाऱ्यांनी निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र, महापौर पद निवडणुकीपूर्वीच सभापती पद द्या, अशी मागणी जाधव व बोज्जा यांनी लावून धरली आहे.
सभापती गणेश भोसले यांच्याशी यासंदर्भात त्यांची चर्चाही झाली, पण निर्णय न झाल्याचे सांगत भोसले यांनी वेळ निभावून नेली. वेळेत निवडणूक न झाल्यास आम्हाला गृहीत धरू नका, असे स्पष्ट करत जाधव, बोज्जा यांनी आपली भूमिकाच जणू काही स्पष्ट केली. या दोघांची मनधरणी करताना भोसले यांनाही कसरत करावी लागत आहे. (प्रतिनिधी)