'तुम्ही ही लढाई सुरु केली, पण आता संपवणार आम्ही'; मनसेचा निलेश लंके यांना इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:08 PM2021-05-31T16:08:59+5:302021-05-31T16:17:10+5:30
निलेश लंके (NCP MLA Nilesh Lanke) यांनी मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्याला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता मनसेने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे.
अहमदनगर/ मुंबई: पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके (NCP MLA Nilesh Lanke) यांनी आपली बनावट ऑडिओ क्लिप तयार करुन सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पारनेर मनसेच्या पदाधिकाऱ्याला १ कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस दिलीय. अविनाश फवार असं या मनसे (MNS) पदाधिकाऱ्याचं नाव आहे. ते पारनेर मनसेचे तालुका उपाध्यक्ष आहेत. आमदार लंके यांनी वकिलामार्फत पाठवलेल्या या नोटीसमध्ये अविनाश पवार यांच्याकडे बदनामी पोटी १ कोटी रुपये आणि नोटीस खर्च ५ हजार असे एकूण १ कोटी ५ हजार रुपये देऊन माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे.
निलेश लंके यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्याला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता मनसेने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. अब्रुनुकसानीची १ कोटी रुपयांची नोटीस मिळाल्यानंतर मनसे पदाधिकारी अविनाश पाटील यांनी आपली बाजू सांगणारा व्हिडीओ शेअर केला. यात त्यांनी थेट आमदार निलेश लंके यांच्यावर फोन करुन त्यांना आणि पक्षाला शिवीगाळ केल्याचा आरोप केलाय. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनाच मदतीसाठी आवाहन केलंय. त्यामुळे आता अहमदनगरच्या या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या स्तरावर उमटण्याची शक्यता आहे.
मनसेचे नेते अखिल चित्रे (Akhil Chitre) यांनी ट्विट करत निलेश लंके यांनी इशारा दिला आहे. अब्रुनुकसानीची नोटीस आहे,कि खंडणीसाठीचं पत्र, असा सवाल उपस्थित करत आपल्या या बेकायदेशीर नोटीसला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, असं अखिल चित्रे यांनी म्हटलं आहे. तसेच निलेश लंके ही लढाई आपण सुरु केली, पण ही लढाई आम्हीच संपवणार हे निश्चित, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
अब्रुनुकसानीची नोटीस आहे,कि खंडणीसाठीचं पत्र?
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) May 31, 2021
आपल्या ह्या बेकायदेशीर नोटीसीला आम्ही कायदेशीर उत्तर देऊच.@Nileshlanke333 ही लढाई आपण सुरू केली पण ही लढाई संपवणार आम्हीच हे निश्चित..@mnsadhikrut
#Defamation नाही #Blackmail#Extortion आहे. pic.twitter.com/67bopTugye
राज ठाकरेंना सांगा की तुमचा मनसैनिक पूर्णपणे खचला आहे-
आपल्यावरील आरोपांवर मनसेचे पारनेरचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार म्हणाले, “बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांच्यासह सर्व मनसे सैनिकांना माझी विनंती आहे की माझा हा व्हिडीओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवा. साहेबांना सांगा की तुमचा मनसे सैनिक पूर्णपणे खचला आहे. आता सहन होत नाही. ११ मे रोजी माझ्यासोबत एक प्रसंग घडला. मी आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात असताना पारनेरचे लोकप्रतिनिधी निलेश लंके यांनी डॉ. गंधे यांच्या फोनवरुन फोन केला. तेव्हा डॉ. गंधे यांनी मला आमदार लंकेंसोबत बोलण्यास सांगितले. तेव्हा लंके यांनी मला आणि मनसे पक्षाला आईवरुन शिवीगाळ केली. हे सर्व करुनही त्यांनी उलट मलाच खोटे अर्ज दाखल करुन अडकवण्याचा प्रयत्न केला.
निलेश लंकेंपासून मला, माझ्या कुटुंबाला धोका आहे. उद्या माझं काही बरंवाईट झालं तर याला हाच व्यक्ती जबाबदार राहिल. हेच आमदार चुका करुन माझी बदनामी करत आहेत. माझी राज साहेबांना विनंती आहे. हा सच्चा कार्यकर्ता आहे, कुणापुढे झुकणारा नाही. आमच्यावर तुमचे संस्कार आहेत. मी पूर्ण खचलेलो आहे, आता याला उत्तर तुम्हीच द्या. माझे आई वडील वयस्कर आहेत. त्यांना टेंशन घेऊन काही झालं, तर याला पूर्णपणे निलेश लंके जबाबदार असतील. माझी कळकळीची विनंती आहे, असंही अविनाश पवार यांनी नमूद केलं.
निलेश लंकेच्या वकिलांची भूमिका काय?
निलेश लंके यांचे वकील राहुल झावरे म्हणाले, पारनेरचे लोकप्रतिनिदी निलेश लंके मनसेचे पदाधिकारी अविनाश पवार यांनी बनावट ऑडिओ तयार करुन फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर बदनामी केलीय. त्यामुळे त्यांना कायदेशीर १ कोटीची अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे. आमदार निलेश लंके यांचं काम जगभर पोहचलं आहे. शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याचं चांगलं उदाहरण त्यांनी उभं केलंय. अशा माणसाची बदनामी केली जात असेल तर त्याला कायदेशीर नोटीस देणं आवश्यक आहे, असं वकील राहुल झावरे यांनी सांगितलं.