बस थांब्यासाठी मनसेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 02:24 PM2018-09-19T14:24:44+5:302018-09-19T14:24:59+5:30
तालुक्यातील धारणगांव व सोनारवस्ती जवळील शेकडो मुले दररोज शिक्षणाचे पाढे गिरविण्यासाठी कोपरगाव शहरात येतात.
कोपरगाव : तालुक्यातील धारणगांव व सोनारवस्ती जवळील शेकडो मुले दररोज शिक्षणाचे पाढे गिरविण्यासाठी कोपरगाव शहरात येतात. त्यासाठी त्यांनी महामंडळाच्या एसटीचे मासिक पासही काढले आहे. परंतु या मार्गावरून जाणा-या महामंडळाच्या बसेस या विद्यार्थ्यांसाठी थांबत नसल्याने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शालेय विद्यार्थ्याच्या वतीने मोर्चा काढत कोपरगाव आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.
सोनारवस्ती चराजवळ धारणगाव परिसरातून अनेक शालेय विद्यार्थी- विद्याथीर्नी शाळा,महाविद्यालयात येत असतात. परंतु या ठिकाणी बस थांबा नसल्यामुळे बस थांबत नाही. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना प्रवासाचा मासिक पास असूनही खासगी वाहनाने कोपरगावला शाळा व महाविद्यालयात यावे लागते. याचा भुर्दंड विद्यार्थ्यांना तसेच पालकांना सोसावा लागत आहे. पैसे नसल्याकारणाने अनेक विद्यार्थी शाळा बुडते त्याची शिक्षा त्यांना भोगावी त्यामुळे येत्या आठ दिवसांत वरील दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांना बस थांब्याचा पाट्या लावण्यात याव्या. अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे .
यावेळी मनसेचे कोपरगाव तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल उपतालुकाध्यक्ष रघुनाथ मोहिते, शहराध्यक्ष सतीश काकडे, सुनील फंड, माजी तालुकाध्यक्ष अलीम शहा, बापू काकडे, विजय सुपेकर, अनिल गाडे, आनंद परदेशी, संजय जाधव ,सुजल चंदनशिव यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.