मनसे दाखविणार शरद पवारांना फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:20 AM2021-01-22T04:20:05+5:302021-01-22T04:20:05+5:30
अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार येथील सुरभि हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या लोकार्पण साेहळ्यासाठी येत असून त्यांना फलक दाखविण्याचा इशारा ...
अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार येथील सुरभि हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या लोकार्पण साेहळ्यासाठी येत असून त्यांना फलक दाखविण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.
कोरोना रुग्णांकडून आकारण्यात आलेली जास्तीची बिले परत करण्याबाबत महापालिकेकडून शहरातील रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. सदर रुग्णालयांना एक कोटी रुपये रुग्णांना परत करण्याबाबत कळविले होते. गोरगरीब रुग्णांना त्यांचे पैसे परत करण्याची मनसेची मागणी आहे. मनसेने याबाबत महापालिकेतही आंदोलन केले होते. मात्र, अद्याप काही रुग्णालयांनी पैसे परत केलेले नाहीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे २४ जानेवारी रोजी नगर दौऱ्यावर येत आहेत. औरंगाबाद महामार्गावरील सुरभि हॉस्पिटलचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते होत आहे. पवार ज्या मार्गाने नगर शहरात येणार आहेत, त्या मार्गावर उभे राहून पवार साहेब गोरगरीब कोराना रुग्णांचे जास्तीची बिले परत मिळवून द्या, अशा अशायाचे फलक शरद पवार यांना दाखविण्याचा इशारा मनसेच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
मनसेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उपजिल्हाधिकारी यांच्या समितीने कोरोना रुग्णांनी तक्रारी केलेल्या बिलांची तपासणी केली. या तपासणीतून शहरातून १४ ते १५ रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून जवळपास एक कोटी रुपये जास्तीचे आकारल्याचे समोर आले आहे. महापालिकेने ही रक्कम परत करण्याचा आदेश रुग्णालयांना दिला होता. मात्र, रुग्णालयांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखविली. नियमाप्रमाणे रुग्णांना बिले दिली गेली नाहीत. त्यामुळे गोरगरीब जनतेची लूट करण्यात आली असून, याबाबत पवार साहेब गोरगरीब जनतेची कोरोना आजारावरील वाढीव बिलांची रक्कम परत मिळवून द्या, अशा आशयाचे फलक मनसेच्या वतीने दाखविण्यात येणार असल्याचे मनसेच्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. पत्रकावर जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत, महिला उपजिल्हाध्यक्षा ॲड. अनिता दिगे, रस्ते आस्थापन जिल्हाध्यक्ष विनोद काकडे आदींची नावे आहेत.
...
सुरभि हॉस्पिटलला दंड
कोरोना रुग्णांकडून जास्तीची बिले आकारल्याप्रकरणी औरंगाबाद महामार्गावरील सुरभि हॉस्पिटलला महापालिकेने नोटिस बजावलेली आहे. पहिल्या टप्प्यात ८ लाख रुपये रुग्णांना परत करण्याबाबत सुरभि रुग्णालयास कळविलेले आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यात तपासलेल्या बिलांमध्ये सुरभि रुग्णालयातील रुग्णांची संख्याही मोठी आहे.
.....
- कोरोना रुग्णांना ८ लाख रुपये परत करण्याचा आदेश महापालिकेने दिला होता. मनपाच्या आरोग्य विभागाची याबाबतची नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्याविरोधात रुग्णालयाने न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने या वसुलीस स्थगिती दिलेली आहे.
- राजेंद्र गांधी, सुरभि हॉस्पिटल
...
- महापालिकेने जास्तीची रक्कम रुग्णांना परत करण्याबाबत रुग्णालयांना नोटीस बजावलेली आहे. मनसेच्या आंदोलनानुसार रुग्णांना पैसे परत न केल्यास परवाना रद्द करण्याबाबत संबंधित रुग्णालयांना कळविलेले आहे.
- डॉ. अनिल बोरगे, आरोग्य अधिकारी, महापालिका
....
- कोरोना रुग्णांकडून नियमबाह्य आकारलेले बिले परत करण्याच्या मागणीसाठी मनसेकडून पाठपुरावा सुरू आहे. वरिष्ठ नेते शरद पवार हे शहरात येत असल्याने त्यांना फलक दाखविण्यात येणार असून, त्यांची भेट घेऊन याबाबत निवेदनही दिले जाणार आहे.
- सचिन डफळ, जिल्हाध्यक्ष मनसे,