फटाके विक्रीस बंदीच्या निषेधार्थ मनसेने फोडले फटाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 03:48 PM2017-10-11T15:48:41+5:302017-10-11T15:50:28+5:30
लाखो रुपयांची गुंतवणुक करुन घेतलेल्या फटाक्यांचे करायचे काय? फक्त एक आठवडात फटाके विक्रीने प्रदूषणात वाढ होते का? मग अहोरात्र वाहने धावत असतात त्याचे काय? असा सवाल मनसेच्या पदाधिका-यांनी केला आहे.
अहमदनगर : राज्यात निवासी भागात फटाके विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ मनसेच्यावतीने दिल्लीगेट येथे फटाके फोडून आंदोलन करण्यात आले.
फटाक्यांच्या आतषबाजीत दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात येतो़ फटाक्यांची सर्वाधिक विक्री दिवाळीतच होते. ठिकठिकाणी व्यापारी फटाके विक्रीचे स्टॉल लावतात. मात्र, दिवाळी तोंडावर निवासी भागात फटाके विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. फटाक्याविना दिवाळी साजरी होऊच शकत नाही. तसेच या फटका विक्रीतून अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे व्यापा-यांनी खरेदी केलेले फटाके विक्रीअभावी पडून राहिले तर व्यापा-यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. जर फटाक्यांवर बंदीच आणायचीच होती तर दोन-तीन महिने अगोदरच आणणे योग्य होते. लाखो रुपयांची गुंतवणुक करुन घेतलेल्या फटाक्यांचे करायचे काय? फक्त एक आठवडात फटाके विक्रीने प्रदूषणात वाढ होते का? मग अहोरात्र वाहने धावत असतात त्याचे काय? असा सवाल मनसेच्या पदाधिका-यांनी केला आहे. याप्रसंगी गिरीष जाधव, नितीन भुतारे, परेश पुरोहित, अभिषेक मोरे, तुषार हिरवे, मयुर घाडगे, गणेश लालबागे, निलेश खांडरे, मनोज राऊत, देवा ढगे, मयुर बोंडगे, अशोक दातरंगे, धीरज पोखरणा, इंद्रजीत लखारा, अमोल गिते आदी उपस्थित होते.