लाडू वाटप करून मनसे वेधणार पेट्रोल दरवाढीकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:21 AM2021-02-16T04:21:40+5:302021-02-16T04:21:40+5:30
पारनेर (जि. अहमदनगर) : इंधनाच्या दरवाढीच्या विरोधात विरोधी पक्षांकडून आणि नागरिकांकडूनही विविध प्रकारची आंदोलने होत आहेत. निषेध, निदर्शने, मोर्चा, ...
पारनेर (जि. अहमदनगर) : इंधनाच्या दरवाढीच्या विरोधात विरोधी पक्षांकडून आणि नागरिकांकडूनही विविध प्रकारची आंदोलने होत आहेत. निषेध, निदर्शने, मोर्चा, बैलगाडी मोर्चा अशी आंदोलने नेहमीच पहायला मिळतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारनेर तालुका शाखा मात्र गावात लाडू वाटप करून पेट्रोल दरवाढीचा निषेध करणार आहे.दरवाढ व भाजप सरकार विरोधात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहोकले यांच्या नेतृत्वाखाली येत्या गुरुवारी (१८ फेब्रुवारी) भाळवणी येथे नागेश्वर मंदिर देवस्थान ते भाळवणी बस स्टॉप तसेच बाजार परिसरात लाडू वाटप करण्यात येणार आहेत. फटाके वाजवून पेट्रोलच्या दराने शंभरी पूर्ण केल्यामुळे उपरोधिकपणे शतकपूर्तीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या आंदोलनाबाबत रोहोकले म्हणाले, पेट्रोल दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यात सर्वसामान्य माणूस होरपळला जात आहे. गुरुवारी सकाळी भाळवणी येथे नागेश्वर मंदिरापासून लाडू वाटपाचा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ठेवण्यात आला आहे. लोकांना दरवाढीची जाणीव करून देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. मनसेतर्फे आम्ही तालुक्यात नेहमी वेगळ्या प्रकारची आंदोलने करतो. त्याचप्रमाणे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे लाडू वाटप आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात मनसेचे पारनेर शहरप्रमुख वसिम राजे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे, पारनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी, नितीन म्हस्के, पप्पू लामखडे, अशपाक हवलदार, वसीम राजे, अविनाश पवार, सतीश म्हस्के, महेंद्र गाडगे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.