संगमनेरात पोलिसांवर जमावाचा हल्ला; तुफान दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 12:14 AM2021-05-07T00:14:36+5:302021-05-07T00:27:51+5:30
अहमदनगर येथील राज्य राखीव पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यावेळी जमावाने तुफान दगडफेक करून काही खासगी वाहनांचेही नुकसान केले.
संगमनेर : शहरात नागरिकांची गर्दी उसळल्याने ती रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. ही घटना गुरुवारी ( दि. ६) संध्याकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास शहरातील तीनबत्ती चौकात घडली. याप्रकरणी सहा निष्पन्न आरोपींसह अज्ञात दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर येथील राज्य राखीव पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यावेळी जमावाने तुफान दगडफेक करून काही खासगी वाहनांचेही नुकसान केले. या घटनेने संगमनेर शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. मात्र, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन बत्ती चौक परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी करणाऱ्या बहुतेक कोणत्याही नागरिकाने मास्क घातलेले नव्हते आणि त्यांच्याकडून फिजिकल अंतर पाळले जात नव्हते. त्यामुळे गस्ती पथकातील राज्य राखीव दलाच्या जवानांनी तेथे जमलेली गर्दी हटवण्याचे प्रयत्न केले. यावेळी जमावातील काही जणांनी पोलिसांवर दगड फेक सुरू केली. तिनबत्ती चौकातील लिंबाच्या झाडाखाली निवाऱ्यासाठी पोलिसांनी ठोकलेला तंबुही उखडून रस्त्यावर फेकून दिला. तीन बत्ती चौकात सुमारे शंभर ते दिडशे जणांचा मोठा जमाव होता. हा मोठा जमाव पाहून पोलिसांनी तेथून पळ काढला. जमावाने काही खाजगी वाहनांचेही नुकसान केल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सलमान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी जुबेर हॉटेलचा चालक, तेथील सर्व कर्मचारी, निसार खिचडीवाला, जाकीर खान, मोहम्मद हनीफ रशीद शेख, अरबाज शेख या निष्पन्न आरोपींसह अन्य दहा ते पंधरा जणांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 337 यासह दंगलीचे कलम 143, 147 तसेच 188, 269 व क्रिमिनल अमेंडमेंट कायदा 1932 चे कलम 7 प्रमाणे वरील सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर निष्पन्न आरोपींसह अन्य बहुतेकजण पसार झाले आहेत.