मोबाईलचा अतिवापर ; अपुऱ्या झोपेमुळे मानसिक, शारीरिक व्याधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:15 AM2021-06-28T04:15:40+5:302021-06-28T04:15:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : मोबाईल खेळण्यास घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी मज्जाव केल्याने दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना याच ...

Mobile overuse; Mental and physical disorders due to insufficient sleep | मोबाईलचा अतिवापर ; अपुऱ्या झोपेमुळे मानसिक, शारीरिक व्याधी

मोबाईलचा अतिवापर ; अपुऱ्या झोपेमुळे मानसिक, शारीरिक व्याधी

लोकमत न्यूज नेटवर्क

संगमनेर : मोबाईल खेळण्यास घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी मज्जाव केल्याने दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना याच महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात घडल्या होत्या. मोबाईल हा अनेकांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. मात्र, याच मोबाईलच्या अतिवापरामुळे झोप पूर्ण नाही, त्यामुळे मानसिक, शारीरिक व्याधींबरोबर इतरही आजार जडू शकतात.

मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेकांना निद्रानाशाचा त्रास जाणवू लागला आहे. त्याचा परिणाम एकूण आरोग्यावर होतो आहे. झोप कमी झाल्याने मानसिक, शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, चिडचिडेपणा, डोकेदुखी, स्मृतिभ्रंश असा त्रास होतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल वापराचे प्रमाण फारच वाढले आहे. दिवस-रात्र मुलांच्या हातात मोबाईल असतो. ते कानात हेडफोन घालून बसतात. मोबाईलचा अतिवापर केल्याबद्दल मुलांना काही बोललो असता, ऑनलाईन अभ्यासाचे कारण त्यांच्याकडून सांगण्यात येते. त्यामुळे त्यांना पुढे काय बोलावे? हेच आम्हाला आता समजत नाही, असे काही पालकांनी सांगितले. मोबाईलच्या वापरामुळे मुले एक्कलकोंडी झाल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल हाताळत बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुले लवकर उठत नाहीत. त्यामुळे चहा, नास्ता, जेवण या सर्व वेळा बदलल्या आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम आरोग्यावर होतो आहे. त्यामुळे चांगल्या आहाराबरोबरच योग्य आणि पुरेशी झोपही शरीराला आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

-----------

हे गंभीर आजारांना निमंत्रण देण्यासारखे

मोबाईलमध्ये इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. ॲण्ड्रॉईड मोबाईल वापरणाऱ्यांना मोबाईलमध्ये अनेक पर्याय उपलब्ध असतात. दिवसभर काम केल्यानंतर रात्री आपण निवांत होतो. विविध पर्याय उपलब्ध असताना त्यांचा वापर करतेवेळी मोबाईलमध्ये वेळ कसा निघून जातो हेच समजत नाही. अनेकदा झोप येत असताना आपण डोळ्यांना ताण देऊन मोबाईल पाहत असतो. याचा त्रास हळूहळू जाणवतो. पुढे याच त्रासाने अनेक व्याधी जडतात. खूप विचार करणे, कामाचा ताण-तणाव अशा अनेक गोष्टींमुळेही झोप येत नाही. त्यामुळे हे सर्व काही गंभीर आजारांना निमंत्रण देण्यासारखे असते.

---------------

इतकी हवी झोप...

नवजात बाळ - १६ ते १८ तास

एक ते पाच वर्षे - १२ तासापर्यंत

शाळेत जाणारी मुले - आठ तासापर्यंत

२१ ते ४० - सहा ते आठ तास

४१ ते ६० - सहा ते सात तास

६१ पेक्षा जास्त - जास्तीत सहा तास

-----------------

चांगली झोप येण्यासाठी कुठलेही व्यसन नको. तसेच दुपारी चारनंतर उत्तेजक पेय घेऊ नये. मनात भीती निर्माण करणारे वाचन करू नये, भीतीदायक चित्रपट, मालिका पाहणे टाळावे. रात्री हलका आहार घ्यावा. त्यानंतर शतपावली करावी. अवेळी व्यायाम करू नये. दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यास झोप येण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी मध्यम गरम पाण्याने अंघोळ करावी, झोप येण्यासाठी हा उपाय देखील चांगला आहे.

डॉ. अभिजित पाटील, मानसोपचार तज्ज्ञ, संगमनेर

-------------

झोप येत नाही म्हणून झोपेची गोळी घेणे हा उपाय नाही. झोपेची गोळी घेतल्यास तिची सवय लागते. गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही. झोपेची गोळी घेण्याऐवजी ध्यानधारणा, प्राणायाम करत आपले छंद जोपासावेत. वाचन करावे. असे उपाय केल्यास झोप येण्यास निश्चित मदत होते.

- डॉ. संदीप कचेरिया, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, संगमनेर

-------------star 854

Web Title: Mobile overuse; Mental and physical disorders due to insufficient sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.