संगमनेरात ‘मोबाइल वापसी आंदोलन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:26 AM2021-08-24T04:26:20+5:302021-08-24T04:26:20+5:30
संगमनेर : राज्यातील अंगणवाडी सेविकांना शासनाकडून मोबाइल देण्यात आले होते. त्यापैकी अनेक मोबाइल नादुरुस्त झाले आहेत. मोबाइल दुरुस्तीसाठीचा खर्च ...
संगमनेर : राज्यातील अंगणवाडी सेविकांना शासनाकडून मोबाइल देण्यात आले होते. त्यापैकी अनेक मोबाइल नादुरुस्त झाले आहेत. मोबाइल दुरुस्तीसाठीचा खर्च हा सेविकांना करावा लागतो. नवीन मोबाइल मिळावेत आणि मोबाइल ॲपमध्ये लाभार्थ्यांची माहिती भरताना ती इंग्रजीऐवजी मराठीतून भरता येईल, अशा ॲपची निर्मिती करावी, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली. संगमनेर पंचायत समितीतील एकात्मिक बालविकास विभागात सोमवारी (दि.२३) दोनशेहून अधिक मोबाइल जमा करत आंदोलन करण्यात आले.
अंगणवाडी कर्मचारी सभेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. निशा शिवूरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सभेच्या तालुकाध्यक्ष भारती धरत, जिल्हा सचिव शांताराम गोसावी, आशा खरात, सुनंदा राहणे, नारंगाबाई ढोकरे, कमल खेमनर, संगीता बोडके यांसह संगमनेर तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
संघटनेचा प्रदेशाध्यक्ष ॲड. शिवूरकर म्हणाल्या, राज्यात १७ ऑगस्टपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोबाइल कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. संगमनेर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीच्या आवारात अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने मोबाइल वापसी आंदोलन केले.
शासनाच्या वतीने २०१९ मध्ये १ लाख ०५ हजार ५९२ सेविकांना मोबाइल दिले होते. या मोबाइलवरून सेविका शासनाला लाभार्थींची वजन, उंची, हजेरी, स्तनदा मातांचा आहार, आरोग्य आदी माहिती पाठवतात. या मोबाइलची वॉरंटी संपली आहे. हे मोबाइल दोन जीबी रॅमचे आहेत. त्यांची क्षमता कमी पडते. सतत बिघडतात, दुरुस्तीसाठी खर्च येतो. तो सेविकांना करावा लागतो. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने वारंवार मागणी करूनही शासन मोबाइल बदलून द्यायला तयार नाही. त्यामुळे अखेर शासनाला मोबाइल परत देण्याचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
____
फोटो नेम : २३०८२०२१ अंगणवाडी कर्मचारी सभा आंदोलन, संगमनेर
ओळ : अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने संगमनेर पंचायत समितीच्या आवारात आंदोलन करण्यात आले.