रस्तालुटीसह मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:20 AM2021-02-10T04:20:15+5:302021-02-10T04:20:15+5:30
कोपरगाव : रस्तालुटीसह मोबईल चोरणाऱ्या टोळीचा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सोमवारी (दि. ८) रात्री साडेनऊच्यासुमारास पर्दाफाश केला आहे. ...
कोपरगाव : रस्तालुटीसह मोबईल चोरणाऱ्या टोळीचा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सोमवारी (दि. ८) रात्री साडेनऊच्यासुमारास पर्दाफाश केला आहे. या टोळीत एकूण पाच आरोपी असून, त्यातील दोन अल्पवयीन आहेत, दोघांना अटक करण्यात आली, तर एक फरार झाला आहे. अटकेतील आरोपीकडून चोरी केलेला एक मोबाईल हस्तगत केला आहे.
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील भाऊसाहेब धर्मा होन यांना मागील महिन्यात १ जानेवारीला रात्री आठच्यासुमारास सावळीविहीर झगडेफाटा रस्त्यावर साईलक्ष्मी मंगल कार्यालय परिसरात चोरटयांनी दुचाकी आडवी लावून त्यांच्याजवळ असलेला मोबाईल फोन व ६ हजार २०० रुपये रोख रक्कम लुटून नेली होती. याप्रकरणी होन यांच्या फिर्यादीवरून २ जानेवारीला कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सखोल तपास करून या टोळीतील आरोपींचा शोध लावण्यास यश आले आहे. या टोळीत एकूण पाच आरोपी असून, त्यातील दोन अल्पवयीन आहेत; तर आरिफ आमिन सय्यद (वय १९, रा. देशमुख चारी, शिर्डी, ता. कोपरगाव) व अजय विजय काळे (रा. पुणतांबा, ता. राहाता) या दोघांना अटक केली असून, वैभव संधन (रा. रुई, ता.राहाता) हा फरार आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पोलीस हवालदार इरफान शेख, जयदीप गवारे, अंबादास वाघ, श्रीरामपूर सायबर सेलचे फुरखान शेख, प्रमोद जाधव यांच्या पथकाने केली आहे.