श्रीरामपूरमध्ये मोबाईल चोरांची टोळी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 06:36 PM2018-02-10T18:36:31+5:302018-02-10T18:36:49+5:30
चोरीच्या मोबाईलचा आय. एम. ई. आय. क्रमांक बदलून मोबाईल विक्री करणा-या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी पकडले. त्यांच्याकडून दोन दरोड्यातील मोबाईल जप्त केले.
श्रीरामपूर : चोरीच्या मोबाईलचा आय. एम. ई. आय. क्रमांक बदलून मोबाईल विक्री करणा-या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी पकडले. त्यांच्याकडून दोन दरोड्यातील मोबाईल जप्त केले.
जिल्ह्यातील चोºया व दरोड्याचे प्रकार वाढत असताना त्यामध्ये चोरीस गेलेले मोबाईल आय.एम. ई. आय. क्रमांकाद्वारे शोधूनही सापडत नव्हते. जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी याबाबत अधिक तपास केला असता श्रीरामपूर येथे मोबाईल हँडसेटचे आय.एम. ई.आय. क्रमांक बदलून ते विक्री करणारी टोळी सक्रीय असल्याची माहिती मिळाली.
या माहितीवरुन गुन्हे शाखेचे फौजदार सुधीर पाटील, हवालदार मनोज गोसावी, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय गव्हाणे, दीपक शिंदे, संदीप पवार, संभाजी कोतकर व रवी सोनटे यांनी श्रीरामपूर शहरातील बिफ मार्केट परिसरात शुक्रवारी छापे टाकून मुजफ्फर इसाक कुरेशी यास अटक केली. त्याने लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यापारी तेजस गुजर याला लुटले होते. या गुन्ह्यात स्वाईप मशीन, मोबाईल व रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली. तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये जब्बार शेख यांच्याकडे घरफोडी केल्याची कबुली दिली.
दोन्ही गुन्ह्यातील चोरलेले मोबाईल आय. एम. ई. आय. क्रमांक बदलून ते विकण्यासाठी तांबोळी संकुलातील विनर मोबाईल शॉपीचे चालक समीर शेख यांच्याकडे दिल्याचे मुजफ्फर कुरेशी याने पोलिसांना सांगितले. तपासादरम्यान गुन्ह्यातील इतर साथीदार जाफर उर्फ कटर शेख व किरण गारुडी उर्फ सोनवणे यांच्याबद्दल माहिती दिली.
गुन्हे शाखेच्या पथकाने समीर शेख यांच्या मोबाईल शॉपीवर व घरावर छापा टाकून लॅपटॉप, २ मोबाईल व एक संगणक जप्त केला. पथकाने पकडलेल्या दोन्ही आरोपींचा लोणी येथील एका गुन्ह्यातील सहभाग उघड झाला आहे. त्यामुळे त्यांना लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या आरोपींकडून मोबाईल चोरीच्या आणखी घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे.