शेतकऱ्यांचे दु:ख पहायला मोदींना वेळ नाही का?
By Admin | Published: June 26, 2016 12:26 AM2016-06-26T00:26:31+5:302016-06-26T00:35:21+5:30
आश्वी : सरकार नावाची कोणतीही व्यवस्था दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही. व्यापारधार्जिण्या शेतकऱ्यांना
आश्वी : सरकार नावाची कोणतीही व्यवस्था दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही. व्यापारधार्जिण्या शेतकऱ्यांना ग्रामीण भागाचे प्रश्न समजलेले नाहीत. मत मागण्यासाठी आलेले पंतप्रधान राज्यातील शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घ्यायला फिरकलेही नाहीत. आता स्मार्ट सिटीच्या उद्घाटनाला येत आहात तर, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनाही भेटून जा, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी भाजप सरकारला मारला आहे.
निमगावजाळी आणि प्रतापपूर (ता. संगमनेर) येथे विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभात विखे बोलत होते. सरकारच्या धोरणावर कडाडून हल्ला चढवताना ते म्हणाले, राज्यातील जनता दुष्काळाने होरपळली आहे. पण आवश्यक उपाययोजना करायला सरकारकडून चालढकल होत आहे.
उलट चुकीची परिपत्रके काढून शेतकऱ्यांना शासकीय अनुदानापासून वंचित ठेवण्याचे काम होत आहे. राज्यात पावसाअभावी मोठे चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांकडील उत्पन्नाची सर्व साधने संपली आहेत. समन्यायी पाणी वाटप कायद्याचा चुकीचा अर्थ काढून भंडारदरा, निळवंडे धरणांसह गोदावरी खोऱ्यातील धरणांतून पाणी सोडण्यात आले. याचा मोठा परिणाम दोन्हीही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना भोगावा लागलो. शेतीक्षेत्र उद्ध्वस्त झाले असून, भविष्यात पिण्याच्या पाण्याचे मोठे आव्हान समोर उभे राहणार आहे. मागील सरकारने शेतकऱ्यांना पॉलिहाऊस, शेडनेटसाठी अनुदान दिले होते. मात्र या सरकारने हे अनुदान विनाकारण रखडविले आहे. राज्याला महसूल मंत्री, कृषी मंत्री नसल्याने सरकारचे सर्व कामकाज ठप्प झाले असल्याकडे विखे यांनी लक्ष वेधले.
(वार्ताहर)
सरकारला भ्रष्टाचाराची कीड लागली असून सरकार नावाची व्यवस्थाच अस्तित्वात राहिलेली नाही. वाळूमाफियांना मंत्र्यांचे संरक्षण मिळत असून अधिकाऱ्यांच्या बदलीचे भाव वाढत चालले आहेत, अशी टीका विखे यांनी पाथरे बुद्रूक येथे केली. जोर्वेतील वाळू माफियांना माजी मंत्र्यांचे संरक्षण मिळत आहे. मागील काळापासूनच महसूलच्या अधिकाऱ्यांचे भाव वाढत चालले आहेत. आता तर सरकारने बदलीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असे सांगत विखे यांनी सरकारवर निशाणा साधला.