मोदी म्हणजे न ऐकणारे हेडमास्तर, शरद पवारांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 01:13 AM2019-03-26T01:13:19+5:302019-03-26T01:13:43+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत आल्यानंतर सर्व सहकारी मित्र चिडीचूप बसतात़ मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनाही त्यांची चिंता असते़ ते कुणाचेच ऐकत नाहीत.
अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत आल्यानंतर सर्व सहकारी मित्र चिडीचूप बसतात़ मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनाही त्यांची चिंता असते़ ते कुणाचेच ऐकत नाहीत़ मोदी म्हणजे कडक हेडमास्तर आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर येथे केली़
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे व्यापाऱ्यांच्या मेळावा झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजीमंत्री मधुकरराव पिचड, पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, आमदार जितेंद्र आव्हाड, अरुण जगताप, संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर यांच्यासह व्यापारी उपस्थित होते़ सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळल्याची टीका पवार यांनी केली़ ते म्हणाले, जीएसटी लागू करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता़ पण, त्यावर देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची मते जाणून घेण्यासाठी एक बैठक बोलविण्यात आली़ या बैठकीत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडाडून विरोध केला़ मात्र मोदींनी सत्तेवर येताच जीएसटी लागू केला़ कुठलाही निर्णय घेताना संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांची मते जाणून घ्यावी लागतात़ तेव्हा तो कायदा पूर्णपणे होतो़ परंतु, पंतप्रधान मोदी यांनी कुणाचेच काहीही ऐकून न घेता नोटबंदी आणि जीएसटीचा निर्णय घेतला़ सरकार निर्णय घेताना संवाद साधत नाही, हेच मोठे दुर्दैव आहे़ जनतेशी संवाद ठेवून जो कोणी कारभार करील, त्यांच्याकडे देशाचा कारभार सोपवा, असे आवाहन पवार यांनी केले़
सैनिकांच्या ७२ बस जम्मूमधून काश्मीरकडे निघाल्या़ एक जीप येते आणि एका बसला धडक देते़ त्यावेळी स्फोट होऊन ४० जवान शहीद होतात, हे दुर्दैवीच आहे़ देशाचे पंतप्रधान मोदी नेहमी ५६ इंचाची छाती लागते, असे सांगत असतात़ या हल्ल्याच्यावेळी तुमची ५६ इंचाची छाती कुठे गेली होती, असा प्रश्न पवार यांनी केला़
राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांचे निलंबन मागे - जयंत पाटील यांची घोषणा
अहमदनगर येथील महापालिकेत महापौर निवडणुकीत भाजपाला उघडपणे पाठिंबा दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ नगरसेवक निलंबित करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच्या सर्व १८ नगरसेवकांचे निलंबन मागे घेण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगर येथे सायंकाळी केली.
डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे २४, भाजपाचे १४, राष्ट्रवादीचे १८ , काँग्रेसचे ५, बसपाचे ४, अपक्ष २, समाजवादी पक्ष १ असे नगरसेवक निवडून आले होते. भाजपाने शिवसेनेला बाजूला ठेवत सत्ता स्थापन करताना काँग्रेस, बसपा, अपक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांचा पाठिंबा घेतला होता. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा आदेश डावलून नगरसेवकांनी भाजपाचे बाबासाहेब वाकळे यांना महापौर निवडणुकीत मतदान केले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर राज्यभरातून टीकेची झोड उठली. राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांना प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पक्षातून निलंबित केले होते. मात्र आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप हाच आमचा पक्ष असल्याचे नगरसेवक वारंवार सांगत होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पदाधिकाºयांशी चर्चा करण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील नगरमध्ये होते. पाटील यांनी नगरसेवकांचे निलंबन मागे घेण्यात आल्याची घोषणा मेळाव्यात केली. पाटील म्हणाले, निलंबित केलेल्या नगरसेवकांनी भाजपाला दिलेली साथ तात्पुरती होती. आम्ही राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नाही, असे त्यांनी वारंवार संपर्क करून मला सांगितले. बेरजेचे राजकारण करताना काही गोष्टींमध्ये सुधारणा करावी लागते, अशीही पुष्टी जयंत पाटील यांनी जोडली.