मोदी-ट्रम्प लोकशाहीचा गळा घोटताहेत : जयदेव डोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:30 AM2018-08-30T11:30:33+5:302018-08-30T11:30:39+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पारंपरिक माध्यमांशी संवाद न साधता सोशल मीडियावर भिस्त ठेवून आपला अजेंडा राबवित आहेत,
अहमदनगर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पारंपरिक माध्यमांशी संवाद न साधता सोशल मीडियावर भिस्त ठेवून आपला अजेंडा राबवित आहेत, हे कृत्य लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे, असे मत माध्यमतज्ज्ञ प्रा़ जयदेव डोळे यांनी मंगळवारी ‘लोकमत संवादात’ व्यक्त केले.
डोळे म्हणाले, सध्या संपूर्ण जगात सोशल मीडियाचा उत्पात सुरू आहे. फेसबूक, टिष्ट्वटर, व्हॉटस्अॅप या माध्यमांचे मालक परदेशात बसून पैसा कमवितात. त्यांचे फॉलोअर्स जितके जास्त तितका अधिक पैसा त्यांना मिळतो.
आपले हित साधण्यासाठी विशिष्ट वर्गाकडून या माध्यमांचा वापर करून समाजात खोटे आणि चुकीचे पसरविले जात आहे. यातूनच दंगली घडतात. याउलट पारंपरिक माध्यमे आजही विश्वासपात्र आहेत. वर्तमानपत्रातून अफवा पसरविली म्हणून कधी कोणत्या संपादकाला शिक्षा झालेली नाही. मास मीडिया लोकशाहीला बळकट करण्याचे काम करतो तर सोशल मीडिया हा याच लोकशाहीला डळमळीत करत आहे. हा फरक समजून न घेता देशाचे प्रमुख जर सोशल मीडियावर भिस्त ठेवत असतील तर हे दुर्दैवी आहे. मोदी तर बोलतात एक आणि करतात भलतेच. त्यांचे मंत्री तर स्वत:चेच विधान वारंवार बदलून समाजाची दिशाभूल करत आहेत, असे सांगत डोळे म्हणाले, इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा वर्तमानपत्र हेच विश्वासपात्र आणि टिकाऊ माध्यम आहे. म्हणूनच समाज या माध्यमाकडे अपेक्षेने पाहतो. बातमी काय घडली यासह का घडली? याचे विश्लेषण येणेही गरजेचे आहे. पत्रकाराकडे विविध विषयांची माहिती असली तरी तिचा वापर कसा करावयाचा हे समजून घ्यावे. स्पर्धेच्या काळात चुकीची बातमी जाऊ नये, बातमीत नकळतपणे घडलेली चूकही समाजावर विपरित परिणाम करणारी ठरते असे डोळे म्हणाले.
परदेशी मीडियातून वास्तव जगासमोर
दिल्ली आणि मुंबईत परदेशी पत्रकारांची संख्या मोठी आहे. हे पत्रकार या देशातील गरिबी, महिलांचे शोषण, दलितांवरील अत्याचार, मानवी तस्करी, मीडियावरील हल्ले आदी विषय मांडतात़ ही विश्वासार्ह पत्रकारिता आहे़ परदेशी मीडियाच्या माध्यमातून देशातील हे चित्र जगासमोर जात असताना आपल्याकडील मोदी भक्त मात्र अवास्तव आणि कल्पित घटनांचा प्रसार आणि प्रचार करण्यात व्यस्त आहेत. यातून एक मोठी विसंगती निर्माण होताना दिसत आहे. आपल्याकडील स्थानिक माध्यमांनीही विविध विषयांवर संशोधन करून वेगवेगळे विषय लोकांसमोर मांडावेत. हे करताना समाजाची दिशाभूल होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे असे डोळे म्हणाले.