मोदीजी, अण्णा हजारेंच्या पत्रांना उत्तर द्या, नागेश्वर मंडळाचे डिजीटल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 05:13 PM2017-09-20T17:13:18+5:302017-09-20T17:13:30+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अण्णांच्या पत्रांना उत्तर द्यावे व लोकपाल व शेतक-यांसाठी स्वामीनाथन् आयोगाची अंमलबजावणी करावी, या मागणीचे पाच हजार मेसेज पंतप्रधान मोदी यांच्या फेसबूक, व्टिटर, ई-मेलवर पाठविण्याच्या अभिनव आंदोलनास रविवारी पारनेर येथील नागेश्वर मित्र मंडळाच्या युवकांनी प्रारंभ केला़
पारनेर : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पत्रांना उत्तर देण्यास टाळाटाळ करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अण्णांच्या पत्रांना उत्तर द्यावे व लोकपाल व शेतक-यांसाठी स्वामीनाथन् आयोगाची अंमलबजावणी करावी, या मागणीचे पाच हजार मेसेज पंतप्रधान मोदी यांच्या फेसबूक, व्टिटर, ई-मेलवर पाठविण्याच्या अभिनव आंदोलनास रविवारी पारनेर येथील नागेश्वर मित्र मंडळाच्या युवकांनी प्रारंभ केला़
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या अडीच वर्षांत लोकपालची अंमलबजावणी करावी, शेतक-यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे़ या पत्रांना पंतप्रधान कार्यालयाने केवळ कार्यवाही सुरू आहे़ लवकर निर्णय घेण्यात येईल, असे त्रोटक उत्तर दिले आहे़ आता अण्णा हजारे यांनी पुन्हा दिल्ली येथे लोकपाल व शेतकºयांच्या प्रश्नांसाठी स्वामीनाथन् आयोग अंमलबजावणी करावी, यासाठी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे़ अण्णा हजारे यांच्या पत्राला तातडीने उत्तर मिळावे म्हणून पारनेर येथील नागेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष सखाराम बोरूडे, कल्याण थोरात, समीर शेख, नजीर तांबोळी, सुहास मोढवे, गणेश कावरे, धीरज महांडुळे, अनिकेत रमेश औटी, रायभान औटी, संदीप खेडेकर, सचिन बडवे, डॉ़नरेद्र मुळे,उदय शेरकर, प्रमोद गोळे, दत्ता शेरकर, राजेंद्र म्हस्के, सतिष म्हस्के, मनोज गंधाडे, विनोद गोळे, हौशीराम वाढवणे,सतिष इंगळे या युवकांनी अभिनव डिजीटल आंदोलनास सुरवात केली आहे़ यामध्ये पंतप्रधानांच्या फेसबुक पेज, व्टिटर, ई-मेलवर पंतप्रधान मोदीजी, अण्णा हजारे यांच्या पत्रांना उत्तर द्या, लोकपालची व स्वामीनाथन् आयोगाची अंमलबजावणी करा, असे मेसेज पाठवणार आहेत़ पारनेर शहरासह तालुक्यातून सुमारे पाच हजार मेसेज या सोशल मीडियावर धडकणार असून मोदी यांच्या डिजीटल इंडियाला डिजीटल आंदोलनातूनच उत्तर देणार असल्याचे युवकांनी सांगीतले़