सेनेच्या गडाला मोदींचाच ‘अंडरकरंट’
By Admin | Published: May 18, 2014 12:11 AM2014-05-18T00:11:10+5:302024-03-20T11:15:14+5:30
पा रंपारिक युतीचे प्राबल्य असलेल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघातही अपेक्षेप्रमाणे खासदार दिलीप गांधी यांनीच आघाडी घेतली आहे.
पा रंपारिक युतीचे प्राबल्य असलेल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघातही अपेक्षेप्रमाणे खासदार दिलीप गांधी यांनीच आघाडी घेतली आहे. विकास कामांबाबत गांधी यांच्यावर तीव्र नाराजी असली तरी ‘अब की बार, मोदी सरकार’च्या सुप्त लाटेने गांधी यांना तारले. शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांनी गांधी यांच्या प्रचाराकडे ढुंकुनही पाहिले नसले तरी नगर शहराने गांधी यांनाच आघाडी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील कार्यकर्त्यांनीही राजळे यांचा दुरूनच डोंगर साजरा केला. तरुण मतदारांना आकर्षित करण्यातही राजळे यांना सपशेल अपयश आले. प्रचारासाठी येणार्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी नगर केवळ ‘विश्राम’गृहच ठरले. महापालिका निवडणुकीतील राजकारण, पैशांचा प्रभाव आणि ‘माळी-मराठा-मुस्लीम’ हा फॅक्टरही मोदी लाटेपुढे फिका पडला. युतीचे प्राबल्य असलेल्या शहरात आमदार राठोड यांचा प्रभाव, महापालिकेतील युतीचे नगरसेवक, माजी नगरसेवकांची संपर्क यंत्रणा कार्यान्वीत झाली नसल्याने गांधींना नगरमध्ये एक लाखाचा टप्पा पार करता आला नाही. त्यांना होमग्राऊंडवरच सेना-भाजपाशी संघर्ष करावा लागला. जिल्ह्याचे मुख्यालय असुनही नगरमध्ये ५६ टक्केच मतदान झाले. तरुण मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यात युती-आघाडीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तरीही गांधी यांनी राजळे यांच्यापेक्षा ३८ हजार २६५ मते जास्त घेतली. महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असुनही त्याचा राजळेंना फायदा झाला नाही. ‘आप’च्या दीपाली सय्यद आणि लोकशासन पक्षाचे बी. जी. कोळसे पाटील यांच्या कष्टाचे अपेक्षित चीज झाले नाही. त्यांच्यासह अन्य उमेद्वारांना डिपॉझिटही वाचविता आले नाही. आमदार राठोड हे तर गांधींचा नव्हे मोदीचा प्रचार करीत असल्याचे वारंवार सांगत राहिले. भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते नगरमध्ये प्रचार करण्याऐवजी शिर्डीत प्रचाराला गेले होते. अॅड. अभय आगरकर यांची शहरातील मोठी साथ गांधी यांना मिळाली. सेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे नगरऐवजी शिर्डीतच तळ ठोकून होते.