मोहा ग्रामपंचायतीत सासू सरपंच तर सून उपसरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:21 AM2021-02-10T04:21:22+5:302021-02-10T04:21:22+5:30
जामखेड : मोहा ग्रामपंचायतीत सासूबाई सरपंच तर सूनबाई उपसरपंच झाल्या आहेत. ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. सरपंचपदी ...
जामखेड : मोहा ग्रामपंचायतीत सासूबाई सरपंच तर सूनबाई उपसरपंच झाल्या आहेत. ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे.
सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सारिका शिवाजी डोंगरे तर उपसरपंचपदी स्वाती वामन डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मागील अडीच वर्षांपासून सरपंच म्हणून सारिका डोंगरे कारभार पाहत आहेत. सरपंच सासू तर उपसरपंच सून आहे. तसेच या ग्रामपंचायतमध्ये भीमराव कापसे व उजाबाई कापसे हे पती-पत्नी सदस्य म्हणून निवडून आले आहेत. मोहा ग्रामपंचायतमध्ये प्रथमच महिलाराज आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी ए. डी. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी राखीव होते. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास सरपंच सारिका डोंगरे यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला तर, उपसरपंच पदासाठी स्वाती वामन डोंगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दोघींचेच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. निवडीनंतर जल्लोष करण्यात आला. जनसेवा विकास पॅनेलचे नेते शिवाजी डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाने नऊपैकी आठ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळविला होता. त्यामुळे निवड बिनविरोध होणार, हे निश्चित होते. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य भीमराव कापसे, उजाबाई कापसे, पार्वती झेंडे, संगीता देडे, विकास सांगळे, पंडित गायकवाड, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
..
०९ मोहा ग्रामपंचायत
...
फोटो ओळी - जामखेड तालुक्यातील मोहा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सारिका शिवाजी डोंगरे तर उपसरपंचपदी स्वाती वामन डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर जल्लोष करताना पदाधिकारी.