भाविकांच्या स्वागतासाठी मोहटादेवी गड सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:11 PM2019-09-28T13:11:37+5:302019-09-28T13:34:26+5:30
मोहटादेवीचे जागृत देवस्थान आहे. नवरात्रकाळात गडावर राज्यातून तसेच परराज्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. चालू वर्षी वरूणराजाने हजेरी लावल्यामुळे परिसर निसर्गरम्य बनला आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मोहटादेवी गड भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे.
पाथर्डी : तालुक्यात मोहटादेवीचे जागृत देवस्थान आहे. नवरात्रकाळात गडावर राज्यातून तसेच परराज्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. चालू वर्षी वरूणराजाने हजेरी लावल्यामुळे परिसर निसर्गरम्य बनला आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मोहटादेवी गड भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे.
मोहटा देवीचे स्थान हे माहूरच्या देवीचे ठाण आहे. भक्ताच्या प्रार्थनेनुसार अश्वीन शुघ्द एकादशीला देवी गडावर येवून राहिली अशी अख्यायिका आहे. राज्यात सर्वत्र विजयादशमीच्या दिवशी देवीच्या यात्रा होतात. मात्र मोहट्याची यात्रा एकादशीच्या भरते. अलिकडील काही वर्षापासून मोहटा देवस्थान नावारूपाला आले आहे. भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवार, शुक्रवार व पौर्णिमेच्या दिवशी गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पहिल्या माळेपासून ते सातव्या माळेपर्यत पायी चालत येणा-या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देवस्थान समितीमार्फत भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. दर्शन रांगेत व गाभाºयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मंदिराचा गाभारा मोठा असल्यामुळे एकाचवेळी अनेक भाविक दर्शन घेवू शकणार असल्यामुळे गाभा-यात गर्दी होणार नाही. त्यामुळे भाविकांना सुलभतेने दर्शन घेता येईल. नवरात्रकाळात सर्व आगारातून जादा बसेस सोडल्या जातात. पाथर्डीतून पहाटेपासून रात्री बारा वाजेपर्यत बसेस सोडल्या जातात. याशिवाय देवस्थानच्या सुध्दा बसेस आहेत. गडावर येणा-या भाविकांसाठी देवस्थान समितीच्या वतीने महाप्रसाद , प्रथमोपचार केंद्र व लिप्टची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
आज घटस्थापना; होमहवन, पालखी सोहळा
नवरात्र काळात घटी बसणे, नऊ दिवस देवीच्या दारात खडा पहारा देणे, संपूर्ण गडाला लोटांगण घालणे अशी नवसपूर्ती भाविकांकडून केली जाते. यासाठी राज्याच्या विविध भागातून येणा-या भाविकांमघ्ये महिलांची संख्या अधिक असते. रविवारपासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे. देवस्थानचे अघ्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. नवरात्र काळात भजन, कीर्तन, कुंकूमअर्चन, होमहवन, देवी पालखी सोहळा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याशिवाय कलाकारांच्या हजेºया, कुस्त्यांचा हंगामा सुध्दा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत.