वर्षभरात ४५ कुख्यात गुन्हेगारांविरोधात मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 10:42 AM2018-10-06T10:42:18+5:302018-10-06T10:50:04+5:30
अहमदनगर : खून, दरोडे, मारहाण, वाळूतस्करी, अपहरण आदी गुन्ह्यात सक्रिय असलेल्या जिल्ह्यातील ४५ कुख्यात गुन्हेगारांविरोधात पोलीस प्रशासनाने मोक्कातंर्गत कारवाई ...
अहमदनगर : खून, दरोडे, मारहाण, वाळूतस्करी, अपहरण आदी गुन्ह्यात सक्रिय असलेल्या जिल्ह्यातील ४५ कुख्यात गुन्हेगारांविरोधात पोलीस प्रशासनाने मोक्कातंर्गत कारवाई केली आहे. तिघांना एमपीडीएतंर्गत स्थानबद्ध केले आहे तर ९ जणांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
मागील वर्षभरात कुख्यात गुंंड प्रवीण आनंदा रसाळ (रा. निघोज ता. पारनेर) याच्यासह त्याच्या टोळीतील २० जण, तौफिक सत्तार शेख (रा. श्रीरामपूर) यांच्यासह त्याच्या टोळीतील ५ जण, संतोष शिवाजी जाधव (रा. अभाळवाडी ता. संगमनेर) याच्यासह त्याच्या टोळीतील तिघे व कुख्यात वाळूतस्कर आणि गुंड याच्यासह त्यांच्या टोळीतील १२ जणांवर मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगारांविरोधात पोलीस ठाण्यांकडून मोक्कातंर्गत प्रस्ताव मागून घेतले होते. हे प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आल्यानंतर त्याला तत्काळ मान्यता देण्यात आली. मोक्कातंर्गत कारवाई झालेले काही गुन्हेगार आधीच जेलमध्ये होते तर जे फरार होते त्यांना पोलिसांनी जेरबंद केले. पोलीस अधीक्षक शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार मधुकर शिंदे, किरण जाधव, नानेकर, रवींद्र कर्डिले, गोसावी, कारखिले आदींच्या पथकाने या कारवाईत मदत केली. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण झाला आहे.
यांच्यावर एमपीडीएतंर्गत कारवाई
पोलीस प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हादंडाधिकारी यांनी मागील वर्षभरात किरण माधव हजारे उर्फ हरिभाऊ सतीश झंजाड (ता. अण्णापूर ता.शिरूर जि.पुणे) व बबलू उर्फ विक्रांत प्रभाकर नवले यांच्यावर एमपीडीएतंर्गत कारवाई करून त्यांना एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.तसेच अवैध कत्तलखाना चालविणे व विविध गुन्हे दाखल असलेल्या श्रीगोंदा येथील अतिक गुलामहुसेन कुरेशी याच्यासह त्याच्या टोळीतील पाच जणांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
हे सराईत गुन्हेगार गजाआड
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या वर्षभरात चन्या बेग, (श्रीरामपूर), रमेश भोसले (नेवासा), प्रदीप सरोदे (शिर्डी), शाहरूख शेख,सोपान गाडे(नेवासा),किरण हजारे (कोपरगाव), भक्ती काळे (श्रीरामपूर), फद्या काळे (श्रीगोंदा), पपड्या काळे (वर्धा), प्रवीण रसाळ (पारनेर), अविनाश बानकर आदी कुख्यात गुंडांना गजाआड केले आहे.
पपड्यासह आठ टोळ्यांविरोधात कारवाई प्रस्तावित
कोळपेवाडी दरोड्यातील कुख्यात गुंड पपड्या काळे याच्यासह नवनाथ गोर्डे, निलेश काळे व इतर चार ते पाच टोळीप्रमुख व त्यांचे साथीदार, सात ते आठ टोळ्यांविरोधात मोक्कातंर्गत कारवाई प्रस्तावित आहे.