राहाता तालुक्यातील दीपक पोकळे टोळीविरुद्ध मोक्का; दोघे अटक, दोघे फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 07:52 PM2018-01-09T19:52:28+5:302018-01-09T19:52:43+5:30
कुख्यात दरोडेखारे दीपक पोकळेसह त्याच्या टोळीविरोधात पोलिसांनी मोक्कातंर्गत (संघटित गुन्हेगारी) कारवाई केली असून, टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे.
अहमदनगर : कुख्यात दरोडेखारे दीपक पोकळेसह त्याच्या टोळीविरोधात पोलिसांनी मोक्कातंर्गत (संघटित गुन्हेगारी) कारवाई केली असून, टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे. पोकळेसह दादू ऊर्फ रामनाथ मोरेहे फरार असून, त्यांच्या शोधासाठी चार पथके तैनात करण्यात आली आहेत.
संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील दीपक पोकळे व त्याच्या टोळीतील अक्षय अप्पासाहेब दाभाडे (रा. नांदुर्खी, ता. राहाता), किशोर चांगदेव दंडवते (रा. साकुरी, ता. राहाता) व दादू मोरे यांच्या विरोधात राहाता पोेलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी, हत्यारांचा धाक दाखवून मारहाण, दमदाटी अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीने १८ नोव्हेंबर २०१७ रोजी साकुरी येथे प्रमोद अण्णासाहेब गाढे यांच्या हॉटेलमध्ये जाऊन पिस्तुलातून फायर करून चाकूचा धाक दाखवून दहशत निर्माण केली होती. याबाबत राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दंडवते व दाभाडे यांना अटक करण्यात आली होती. या टोळीची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेत पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपाधीक्षक सागर पाटील, निरीक्षक बी़ एस़ कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, सहायक फौजदार मधुकर शिंदे यांनी मोकांतर्गत कारवाईचा प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक) यांनी मंजुरी दिली आहे.
इतर टोळ्यांवरही लवकरच कारवाई
जिल्ह्यात विविध गुन्ह्यांत सक्रिय असलेल्या इतर टोळ्यांची माहिती संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यांच्यावरही अशाच पद्धतीने कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले़