चिचुंद्रीमुळे घडले प्रामाणिकपणाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:28 AM2020-12-30T04:28:20+5:302020-12-30T04:28:20+5:30
अहमदनगर : कारमध्ये घुसलेली चिचुंद्री काढण्यासाठी रस्त्यावरच कार थांबवून त्यातील बाहेर काढलेल्या बॅगा तशाच रस्त्यावर विसरल्याचे विवाहस्थळी गेल्यानंतर लक्षात ...
अहमदनगर : कारमध्ये घुसलेली चिचुंद्री काढण्यासाठी रस्त्यावरच कार थांबवून त्यातील बाहेर काढलेल्या बॅगा तशाच रस्त्यावर विसरल्याचे विवाहस्थळी गेल्यानंतर लक्षात आले. मात्र, दोन तासानंतरही त्या बॅगा तशाच जपून ठेवत परत मिळाल्याने औरंगाबाद येथील उद्योजक गोरक्षनाथ वायभासे यांना प्रामाणिकपणाचा अनोखा अनुभव मिळाला. माणुसकी आणि प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याची भावना त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
मूळचे घाटप्रिंपी (ता. आष्टी, जि. बीड) येथील उद्योजक गोरक्षनाथ तुकाराम वायभासे हे एका लग्नासाठी करंजीमार्गे औरंगाबाद रोडवरील घोडेगाव येथे निघाले होते. रस्त्यात देवराईजवळ आल्यानंतर त्यांच्या गाडीत एक चिचुंद्री आढळून आली. तिला बाहेर काढण्यासाठी त्यांनी रस्त्यातच गाडी थांबविली. चिचुंद्रीला बाहेर काढता यावे, यासाठी त्यांनी कारमधील बॅगा रस्त्यावर काढून ठेवल्या. त्यानंतर चिचुंद्रीला बाहेर काढले आणि बॅगा रस्त्यावरच विसरून ते सहकुटुंब घोडेगावला पोहोचले. मंगल कार्यालयात गेल्यानंतर बॅगा विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी ते पुन्हा माघारी फिरले. यावेळी तेथील गणेश भास्कर अकोलकर व हरिभाऊ संभादी अकोलकर यांनी बॅगा संभाळून ठेवत वायभासे यांची प्रतीक्षा करीत उभेच होते. बॅगा पाहून वायभासे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
मात्र बॅगा कोणाच्या आहेत, त्यामध्ये नक्की काय आहे, याबाबत काही विपरीत घडायला नको म्हणून अकोलकर यांनी पाथर्डी पोलिसांना फोन करून बोलावून घेतले होते. याबाबत कोणाची काही तक्रार नसल्याने पाथर्डी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कायंदे यांनी वायभासे यांना बॅगा परत केल्या. या बॅगेत सर्व वस्तू जशाच्या तशा मिळाल्याने वायभासे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अकोलकर यांच्यासारखे प्रामाणिक माणसे असतील तर सर्वच सुरक्षित राहतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
---
फोटो- २८ वायभासे
रस्त्यावर विसरलेल्या बॅगा सहायक पोलीस निरीक्षक कायंदे यांनी गोरक्षनाथ वायभासे यांना प्रदान केल्या. समवेत गणेश व हरिभाऊ अकोलकर.