कोपर्डीत होणार पीडित मुलीचे स्मारक
By Admin | Published: July 4, 2017 05:03 AM2017-07-04T05:03:20+5:302017-07-04T05:03:20+5:30
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्येच्या संतापजनक घटनेस १३ जुलैला एक वर्ष पूर्ण होत असून, त्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्येच्या संतापजनक घटनेस १३ जुलैला एक वर्ष पूर्ण होत असून, त्या दिवशी अत्याचाराची बळी ठरलेल्या मुलीची श्रद्धांजली सभा व मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाचा आढावा घेण्यात येणार आहे़
कोपर्डी येथे भय्युजी महाराज यांच्या सूर्योदय ट्रस्टतर्फे पीडित मुलीचे स्मारक उभारण्यात येणार असून, रविवारी कामाचे भूमिपूजन झाले. श्रद्धांजली सभा व मेळाव्याबाबत रविवारी गावातील मंदिरात बैठक झाली़
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर, अॅड़ कैलास शेवाळे, संजय तोरडमल, बाळासाहेब साळुंके, लालासाहेब सुद्रिक आदी उपस्थित होते़
९ आॅगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त राज्यभरातील मराठा समाज मुंबईत येणार असून, मूकमोर्चा काढण्यात येणार आहे़ मोर्चाचे नियोजन कोपर्डीतील बैठकीत होणार आहे़ आगामी आठ दिवसांमध्ये मेळाव्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा निर्णय सर्वानुमते
झाला़ त्यासाठी देशातील व राज्यातील सर्व मराठा नेते व प्रमुख कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्यात आले आहे़ कोपर्डी अत्याचार प्रकरणात फिर्यादी असलेल्या तरुणाचा रविवारी कोपर्डीत साध्या पद्धतीने विवाह झाला़ आईचे छत्र
हरपलेल्या गावातील मुलीशी त्याने विवाह केला़